Monday, January 25, 2010

दमलेल्या शिष्याची कहाणी

कविराज संदीप खरेंनी लिहिलेले व डॉ. सलील कुलकर्णींनी संगीतबद्ध केलेले ’दमलेल्या बापाची कहाणी’ हे हृदयाचा बांध फोडून जाणारे गीत एव्हाना प्रत्येक मराठी माणसाने ऐकले असेलंच. खालील गीत हे त्याचीच ’अध्यात्मिक’ आवृत्ती म्हणून गणायला हरकत नाही !!! ’मनुष्यत्व’, ’मुमुक्षत्व’ आणि ’महापुरुषसंश्रय’ अश्या तीन गोष्टी फार भाग्याने मिळतात असं आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. या तिन्ही प्राप्त होऊन परिस्थितीच्या रेट्याने आत्मज्ञानाच्या उदात्त ध्येयापासून शेकडो योजने दूर असलेल्या शिष्यांचं हे मनोगत.
सदगुरुकृपा झालेली असूनही अनाहूतपणे संसाराच्या महापुरात अडकलेल्या आणि त्यामुळे उद्वेग निर्माण झालेल्या एका सच्च्या मनाचं हे स्वगत ’दमलेल्या शिष्याची कहाणी’ च्या रुपाने मांडत आहे.


कोमेजून थांबलेली एक फिकी वाणी,
उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी,
रोजचेच आहे सारे काही आज नाही,
माफी कशी मागू स्वामी मला तोंड नाही
झोपेतच नामाला मी धरतो मुठीत
निजेतच तरी काळ - मगरमिठीत,
सांगायची आहे गुरूराजा दयाळा,
दमलेल्या शिष्याची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥१॥


आटपाट नगरात गर्दी होती भारी,
घामाघुम साधक करी पोटासाठी वारी,
रोज सकाळीचं तरी निघताना बोले
साधनेत बुडायाचे राहुनिया गेले,
जमलेच नाही काल ध्यान मला जरी,
आज परी बैठक मी करणार पुरी,
भौतिकतेच्या पुढे मारू मग फेरी,
लहानग्या या देहासाठी ब्रम्हांडाची सरी,
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला,
दमलेल्या शिष्याची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥२॥


ऑफिसात उशीरा मी असतो बसून
चाकोरीचे कागद चार बसती रूतून,
तास तास जातो तुझ्या स्मरणावाचून
एक एक दिवा जातो हळूच विझून,
अश्या वेळी काय सांगू जीव तीळ तीळ तुटे
भोग हे बघून पाणी डोळ्यातून दाटे,
वाटते की उठूनिया तुझ्या चरणी यावे
तुझ्या कृपेच्या धारेसाठी लहानगे व्हावे,
उगाचच पहावे अन् ऐकावे जे वदशी
जसे होईल तसे भाव मांडावे तुझ्याशी,


वचनांनी, नजरेनी बोलशील काही,
टीपताना भान मला उरणार नाही,
हसुनिया जादू मग दाखवेल काही,
दूरूनच गमक ते कळणार नाही
तरीसुद्धा भक्तीचा मी चालवीन वसा,
क्षणाक्षणावर ठेवीन दास्याचा हा ठसा
सांगायची आहे गुरूराजा दयाळा,
दमलेल्या शिष्याची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥३॥


पण दमल्या मनाला येते जांभई,
मऊ सोपे रस्ते मला का कधी नाही,
निरूपण ऐकायला येतो मी धावून
स्वतःची व्यथा ती मूकपणे सावरून


व्यथा माझी सांगताहे ऐक राया काही
सदोदीत जरी का मी तुझ्या बोधात नाही,
भाव, भक्ती, प्रेम, माया, विश्वास ना मला,
संतांपरी दिननिशी भजतो ना तुला,
तुझ्याहाती जीवनाचा सुकाणु ना दिला,
वचनावर तुझ्या जीव टाकता न आला,
सांगायची आहे गुरूराजा दयाळा,
दमलेल्या शिष्याची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥४॥


अजून आठवतो तुम्ही केलेला तो पहिला उपदेश
आणि आदिम ब्रम्हवाक्याचा केलेला तो निर्देश,
नमस्कार करण्याआधी सुद्धा म्हणला होतात ’कल्याण’,
आणि तुमच्या आशिर्वादासाठी एकवटलेले पंचप्राण,
लटपटत्या पायांनी साधनेत टाकलं पाऊल पहिलं,
व्यवहाराचंच बघत राहिलो फक्त, अध्यात्म जगायचंच राहिलं,


असा गेलो आहे स्वामी पुरा अडकून,
हल्ली देवालाही पाही झोपेत दुरून
असे कसे भोग देव साधकाला देतो,
ध्यानाचा वसंत किती उशीरानं येतो
एका गावी राहुनिया मनामध्ये घोर,
सत्संगाच्या आड येते संसाराची कोर,
प्रबोधन माझे सारे गेले निसटून
उरे काय आता माझ्या ओंजळीमधून
जरी असे तुझ्यापाशी माझ्यासाठी कृपा,
नजरेत माझ्या काही शरमेच्या छटा,
तुझ्या जगातून मी हरवेन का रे
पुढे पुढे मला काही आठवेल का रे
परतीच्या वाटेवरी उंबरठ्यामध्ये,
मुक्तीसाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना नानाना.... ना नानाना..... ॥५॥
(टीपा –
१. मूळ गाणे खाली देत आहे. तेही कमालीचे भावपुर्ण आणि काळजाला घरे पाडणारं असंच आहे. जरूर वाचा.
२. ’दमलेल्या बाबाची कहाणी’ अल्बमवर वर मी लिहिलेला लेख आपल्याला या लिंकवर वाचता येईल.
३. तिरप्या लिपीत लिहिलेला मजकूर voice over आहे व तो गद्यात म्हणायचा आहे.)
****************************************************************************************
मूळ गीत – दमलेल्या बाबाची कहाणी
कवि – संदीप खरे

संगीतकार, गायक – डॉ.सलील कुलकर्णी

कोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी,
रोजचेच आहे सारे काही आज नाही,
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत,
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला,
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥१॥

आटपाट नगरात गर्दी होती भारी,
घामाघुम राजा करी लोकलची वारी,
रोज सकाळीचं राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले,
जमलेच नाही काल येणे मला जरी,
आज परी येणार मी वेळेतच घरी,
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी,
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी,
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला,
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥२॥

ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून,
तास तास जातो खालमानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विझून,
अश्या वेळी काय सांगू काय-काय तुटे
आठवासोबत पाणी डोळ्यातून दाटे,
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे,
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी,


उधळत, खिदळत बोलशील काही,
बघताना भान मला उरणार नाही,
हसुनिया उगाचच ओरडेल काही,
दूरूनच आपल्याला बघणारी आई,
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा,
क्षणाक्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला,
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥३॥

दमलेल्या पायाने जेंव्हा येईल जांभई,
मऊ मऊ दूध भात मग भरवेल आई,
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी,
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी


कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदीत जरी का मी तुझ्या पास नाही,
जेवू, खावू, न्हाऊ, माखू, घालतो ना तुला,
आईपरी वेणीफणी करतो ना तुला,
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा,
तोही कधी गुपचुप रडतो रे बाळा,
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला,
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना नानाना.... ना नानाना..... ॥४॥

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा तोंडी मऊ भात,
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस ’बाबा’,
रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा तू ताबा,,
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं,


असा गेलो आहे बाळा पुरा अडकून,
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो,
लवकर जातो आणि उशीरानं येतो
एका घरी राहुनिया मनामध्ये घोर,
तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर,
बालपण गेले तुझे सारे निसटून
उरे काय तुझ्या- माझ्या ओंजळीमधून
जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे,
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे,
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये,
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना नानाना.... ना नानाना..... ॥५॥