Tuesday, January 19, 2010

रंध्रात पेरिली मी

एखादी रेकॉर्ड जशी एकाच जागी अडकून पडावी तसा काळ थांबून रहायला हवा.
आत्तापर्यंतचं आयुष्य कसं एखाद्या फ्लॅशसारखं चमकून जात मनाच्या डोळ्यांसमोर...
ते शाळेत मिळालेलं पहिलं बक्षिस... पाचगणीचा धबधबा... परीक्षा बघणारा नोकरीतला तो कठीण प्रसंग.... चांदण्या रात्री, चाफ्याच्या घमघमत्या वासात पिलेलं मसाला दूध... NH-17 वर केलेला तो माणगाव ते रत्नागिरी प्रवास.... भगवंताचं नाम घेताना क्वचित तरळलेला अश्रूचा एकाकी थेंब.... पिंपळछायेत सुचलेली ती भावुक कविता.....बाईकवर भन्नाट वेगात मारलेला तो फेरफटका.... एका वसंतात पाठलाग करायला लागलेले दोन डोळे.... ऑपरेशन टेबलवर झोपलेलं असतानाही सुचलेले पीजे.....काळजाला भिडणार्‍या चालीचं गाणं ऐकतानाचं ते मिटून जाणं... मनाचं माकड एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर नुसत्या उड्या मारत राहतं !!

घराच्या खिडकीतून दिसणार्‍या डोंगररांगा कश्या निःस्तब्ध उभ्या आहेत. वारा वहात नाहीये. रस्तावरही सामसूम. ही निष्प्राण दुपार माणसाला मोठा तत्वचिंतक, साधक वगैरे बनवून जाते. दूर क्षितीजावर अजूनही मानवजातीचा प्रवास अगदी केविलवाणा हसत असतो. आपण मात्र रोजचीच कोष्टकं सोडवू पाहतो.....
माध्यान्हीचा सूर्य मला खुप जवळचा वाटतो.
समतोल असावं तर असं. द्वंद्वरहीत. कुठल्याही बाजूला झुकायला नको.
आणि ही दुपार. कुठंतरी पक्ष्याचं ओरडणं. कुठंतरी जात्या क्षणाला पकडून ठेवण्याची फुकाची धडपड. अगदी नाहीच जमलं तर नियतीच्या कुशीत तोंड खुपसून एकदम हमसावंस वाटतं.
खरं काय नि खोटं काय? आपलीच सावली आपल्या पायाखाली लपू लागली की ओळखायचं दुपार झाली. आता आत्मपरीक्षण मस्ट. निसर्गातले हे सूचक इशारे मनावर घ्यायचे का नाही हे ज्याच्या त्याच्या भाळावरचं प्रारब्धचं ठरवत असावं बहुतेक....
माध्यान्हीच्या चढत्या भाजणीबरोबर रोमरोमात, पंचप्राणात एक अनामिक थरथर जाणवू लागते. अवकाशाच्या पोकळीतल्या शब्दहीन संकेतांना प्रतिसाद तरी कसा द्यायचा? आपण नकळत विचार करण्याचा प्रयत्न करतो.

हळुवार संवेदनांना फक्त आपल्याच उराशी झाकून ठेवावं की उतरवून काढावं कागदावर?
ठरत नाही काही पटकन. तसेही आपण खरडलेल्या ओळींनी कुणाला काय फरक पडणार म्हणा.
लडाखच्या धीरगंभीर वातावरणात ध्यानाला बसलेला बौद्ध साधू किंवा सवाई गंधर्वमध्ये अफलातून तान घेणारा कसलेला गायक. भौतिकातली सोन-सुखं विकत घेणारा नवमध्यमवर्गीय असो की नशिबाची साथ मिळताच खोपा बांधणारी चिमणी. प्रत्येकाने आपापली अक्षरे ओळखलेली. शब्द आपल्यापुरता शोधून काढलेला.
कष्टाची फावडी-कुदळ बाजूला ठेवून वळणावरच्या बांधावर विसावायची ही दुपार.
लांबवर दिसणार्‍या मृगजळाचं आल्हाददायक दर्शन घेण्याची ही दुपार.
आपण आपल्या आत डोकावतो का, हा खरा बिकट सवाल म्हणायचा...
त्या विस्मरणी आठवण आहे
घन अर्थांची साठवण आहे,
तव लीलेने विस्मय होता
मज नमनाची पाठवण आहे...

सरलेली सकाळ आणि येणारी संध्या यांच्या परफेक्ट मध्यावर असलेली ही दुपार आपल्या रंध्रातल्या कितीतरी अस्फुट काव्यांना वाचा फोडते ना?