Wednesday, January 13, 2010

देवाघरचे ज्ञात कुणाला.....

हे असं कधीपासून सुरू झालं मलादेखील माहीत नाही. अगदी अनाहूतपणे मला ’क्रायसिस मॅन’ (आपल्या शुद्ध मराठीत सांगायचे तर ‘आगविझव्या’) असे नामाभिधान पडले.
बाकीच्या पामर मंडळींना सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या सुप्रसिद्ध SDLC (Software Development Life Cycle)च्या विवीध अवस्थांनुसार कमी-जास्त कामाच्या फेजेस येतात. लोक ऑरकूट, फेसबुक वर निवांत टाईमपास करताना दिसतात. टेबल टेनिस खेळतात. बाहेर जाऊन बॅंकांची कामे करून येतात. WFH करतात. ऑन-ड्युटी जाऊन सुजाता मस्तानी पिऊन येतात. मॅनेजर लोकही त्या दिवसांमध्ये त्यांच्या या चैनीकडे ’जाऊ दे, आत्ता तसेही काही विशेष कामही नाहीये...’ अश्या अत्यंत उदार अंतःकरणाने पाहतात.
माझ्याबाबत मात्र झडून सगळ्या मोठ्या लोकांना काय अंगात येतं कळत नाही. जणू कंपनीकडून मी दीड-दोन कोटी रूपयांचे कर्ज घेतले आहे आणि दिवसाचे शक्य तेवढे क्षण माझ्याकडून काम करून घेतल्याने ते फिटायची थोडीबहुत शक्यता आहे अश्या आविर्भावात मला projects assign केले जातात.
अगदी जेंव्हा QAचे लोक आमच्या सिस्टिमचे टेस्टींग करत असतात तेंव्हादेखील येनकेनप्रकारेण मी रात्रंदिवस कसा खपत राहीन असा निकराचा प्रयत्न कुरूक्षेत्री चालू असतो. (केवळ हे साध्य करण्यासाठी निरनिराळ्या शक्कला लढवण्याचाच पगार यांना मिळतो की काय अशी दाट शंका आजकाल मला येऊ लागली आहे !!!)
माझे काम sincerely अन् वेळेत केल्यानंतर, त्याची शिक्षा म्हणून की काय मला दुसर्‍या अनेक ठिकाणी लागलेल्या आगी विझवायला जावे लागते. एकदा तिरीमिरीत जाऊन ‘How To Say No, When You Want To Say No’ नावाचे सेल्फ-हेल्प पुस्तक आणले. पण ते वाचण्याइतका वेळही मला अजून मिळालेला नाही :(
नवनव्या प्रोजेक्टवर मला टाकले जाते तेंव्हा तिथली अवस्था नेहमीच कशी असते माहीत आहे?
४२ चेंडून ८३ धावा काढायच्या आहेत.....७ विकेट गेलेल्या आहेत......डे-नाईट मॅच आहे.....चेंडू वाट्टेल तसा reverse swing होतो आहे......खेळपट्टीला कुठे तडे गेले आहेत तर कुठे चेंडू बॅटवरच येत नाहीये..... जवळपास चाळीस षटकांचा खेळ झाल्यामुळे चेंडूचा रंग मातकट होऊन गेला आहे... आणि अश्या परिस्थितीत आमच्या कप्तानाची (पक्षी: Management) माझ्याकडून अपेक्षा असते की या तळाच्या दोन-तीन फलंदाजांना घेऊन सामना जिंकून द्यावा – तोही एखादी ओव्हर शिल्लक ठेवून !!!! (अर्थात Man Of The Match चे बक्षिस कायमच जाते ते पहिल्या पंचवीस ओव्हर कूर्मगतीने खेळून ११० चेंडूत ७३ रन करणार्याळ एखाद्या लाडक्यास किंवा चक्क कधीकधी आमच्या Non-Playing कोचला – म्हणजेच नुसत्याच Excel शीटा भरणार्‍या आमच्या पीएमला....)

सलामीला येवून, आपल्या कलानुसार निवांत फलंदाजी करण्याचं सुख आमच्या नशिबी नाहीच कधी. त्यामुळे वर्षाचे बारा महिने आणि आठवड्याचे पाचही दिवस (कधी कधी सहा वा सातही) प्रचंड काम... आव्हाने.... डोक्यावर टांगत्या तलवारी...हाय रे,
“भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले,
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले...
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे,
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले....” – सुरेश भट

याला एक कारण माझी रास ’कन्या’ हे असावे !!!
इतर कुणाच्या बाबत न घडणार्‍या अचाट गोष्टी आमच्याच वाट्याला का येतात कोण जाणे.... सर्व कागदपत्रे अगदी व्यवस्थित देऊनही चुकीच्या आडनावाने पासपोर्ट इश्यू होणे, बिझिनेस डायरेक्टरला भेटायला जायच्या दिवशीच दरड कोसळून एक्सप्रेस वे जाम होणे, नव्या कोर्यार लॅपटॉपमध्ये मूळ कंपनीकडूनही न सुटणारा गूढ असा Sound distortionचा प्रॉब्लेम असणे, सिग्नलला आपल्या पुढे उभी असलेल्या रिक्षाला ० ते १० एवढाच वेग असणे, खरेदी केल्यानंतर आठवडाभरातच नव्या कोर्याप दुचाकीच्या किल्ल्या लागणे बंद झाल्यामुळे सर्व लॉक्स बदलावी लागणे, ’बिग बझार’मध्ये आपली सोडून इतर रांगा भराभर पुढे जाणे आणि आपल्या पुढच्या भगिनीच्या ट्रॉलीतून कल्पवृक्षाप्रमाणे अनंत वस्तू निघत राहणे, खाजगी कामानिमित्त घरी लवकर जायचे त्याचदिवशी संध्याकाळी appraisal discussion ठेवले जाणे आणि कहर म्हणजे तीन महिने आधी सांगून कोकणातील आपल्या कौटुंबिक सहलीसाठी मान्य करून घेतलेल्या रजेच्या आदल्या दिवशी applicationमध्ये अतिशय भीषण समस्या निर्माण होणे व त्यामुळे आपली रजा रद्द करावी लागणे.. अश्या विदारक घटना या फक्त आणि फक्त ’कन्या’ राशीच्या बिचार्‍या लोकांच्या बाबतीतच संभवतात. (प्रस्तुत लेखकाने याहीपेक्षा विस्मयजनक व उद्वेगजनक घटनांमधून आपल्या नशिबाची खडतर उपेक्षा पाहिलेली आहे. हे फक्त वानगीदाखल काही मासले... हा ब्लॉग tragedyमध्ये रूपांतरीत होऊ नये म्हणून आवरते घेतो !!!)
दुसर्‍या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अडलेली घोडी सोडवण्यासाठी यांना मीच का आठवावा हे कोडे मला जसे सुटलेले नाही तसेच वेळकाळ न बघता, आपली हातातली कामे सोडून धावून जाऊन केलेल्या मदतीच्या अनेक प्रसंगांचा आमच्या वरिष्ठांना वेतनवाढीच्या वेळी सोईस्कररित्या कसा काय विसर पडतो याचे मला नेहमीच अप्रुप वाटते.
एकंदरीत काय, तर आमच्या नशिबी विश्रांती नाही :(

एक प्रोजेक्ट संपलेला असतो.. माझे शेजारीपाजारी कॉंप्युटरवरची ऑनलाईन गेम किंवा प्रदीर्घ चॅट संपवून पिझ्झा किंवा पाणीपुरी खायला निघतात.. त्यांच्या Inbox मध्ये, संपलेल्या प्रोजेक्टमध्ये सर्वांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल अभिनंदन करणारी आणि आभार मानणारी मोठ्या साहेबांची मेल येऊन पडलेली असते... आता सुट्ट्यांच्या, पार्ट्यांच्या योजना बनत असतात....
मी मात्र माझ्या क्युबिकल मधल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात ’झेक रिपब्लीक’ किंवा ’डल्लास’ मधल्या एखाद्या युजरच्या समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या साहेबाने ’XXX team is facing the major roadblock. Will appreciate your help’ असा निरोप पाठवल्यानंतर त्या अडकलेल्या लोकांचे केविलवाणे चेहरे आठवून मी सगळं बाजूला सारून त्यांना मदत करायला धडपडायला लागतो.
माझ्यावरचा ‘The Crisis Man’ हा शिक्का अजूनच गडद होत जातो. मी मात्र खिडकीतून दूरवर दिसणार्‍या धूरकट क्षितीजाकडे पाहत गाणे गुणगुणतो –
“सारी उम्र हम ... मरमरके जी लिये... इक पल तो अब हमे... जीने दो, जीने दो !!!!!”

डिसक्लेमर – काल्पनिक (हो.. उगाच कचेरीतल्या कुणी वाचले तर नसती लफडी :P:P)