Friday, January 8, 2010

नविन गझल - ’सहजंच सुचली म्हणूनी’


सहजंच सुचली म्हणूनी, मी मजवर कविता रचली,
परी अडखळे सूर अंतरी, प्रतिभाही अवचित रूसली ॥धृ॥

मी घेतला हाती विडा, गगनाला कवेत घेण्याचा,
थरथरत्या पंखांची फडफड, माझी झेपंच मुळी हुकली ॥१॥

रातराणीच्या सुगंधात मी, मोहरलो कितीदा निशीदीन,
तो चंद्र लपता घनतमी, चांदण्यांची तिथीच चुकली ॥२॥

मला मज वाटे जे जे, कसे दूर दूर होते,
श्वासांच्या आपुलकीला, माझीच सदने मुकली ॥३॥

कसा पहायचा पाऊस, अन्‌ कशी सोसायची धगधग,
अंकुर इवलाही तरेना, ओढ जीवाची सुकली ॥४॥

मी गेलो स्पर्शाया त्या, अनाहताच्या बिगुलाला,
काटेरी कोरड्या या जगी, अंती जाणीव माझीचं झुकली ॥५॥

- कवि विक्रांत देशमुख