Sunday, January 3, 2010

’दमलेल्या बाबाची कहाणी’ – अल्बम प्रकाशन

दि. २ जानेवारी २०१०,
शरद ऋतूतील एक आल्हाददायक संध्याकाळ.....पश्चिमेच्या केशरी रंगात आकाश आपली कृष्णछाया अलगद मिसळू लागलेले.... नदीकिनारी नाजूकपणे वाहणारा तलम वारा… ’घरकुल लॉन्स’ विवीधरंगी दिव्यांनी उजळून गेली होती. कानावर कधी ’बिस्मीला खान’साहेबांची सनई तर ’हरीप्रसाद चौरसियां’च्य बासरीचे मधूर सूर पडत होते.
अश्या भारलेल्या वातावरणात सुमारे ७०० ते ८०० श्रोते अतिशय प्रसन्नपणे छोटेखानी पण सुबकपणे सजवलेल्या व्यासपीठाकडे पहात होते. नजरेत होती एक आतुरता व खुप सारं कौतुक.....
आज संदीप-सलील जोडीचा नवीन अल्बम ’दमलेल्या बापाची कहाणी’ प्रकाशित होणार होता. या प्रकाशनासाठी पुण्याची निवड आणि औचित्य म्हणून त्यांच्या अमाप गाजलेल्या ’आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचा अजून एक बहारदार प्रयोग.... प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वहात होता.
ठीक सात वाजता पुणेकरांचे लाडके संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कविसम्राट संदीप खरे यांचं स्टेजवर आगमन झालं. ’जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही....चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही’ या सुश्राव्य गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संदीप-सलीलच्या हजरजबाबी, चुरचुरीत पण एकदम precise कोट्यांनी हास्याचे फवारे उडवायला सुरूवात केली. अर्थात कवितेचा आशय नेमका पोहोचवणे, गंभीर विषयाचा यथोचित आब राखणे, आवश्यक तेथे प्रेक्षकांना अंतमुर्ख करणे इत्यादी ’आ.बो.का.’ मध्ये प्रकर्षाने आढळणार्‍या वैशिष्ट्यांचं दर्शन घडत होतंचं.
चढत्या वाढत्या भाजणीने रंगत गेलेल्या या कार्यक्रमाने कळस गाठला सलीलदादांनी ’कोमेजून गेलेली एक परीराणी’ हे बोल आळवायला सुरूवात केल्यावर.... ’दमलेल्या बाबाची कहाणी’ या अखिल मराठी मनाचा बांध फोडून गेलेल्या गाण्याने उपस्थितांना परत एकदा अक्षरशः सुन्न करून टाकलं...
या सीडीचं प्रकाशनासाठी कोणी सेलिब्रेटी बोलावलेले नव्हते. शीर्षकगीताबद्दल प्रेक्षकातीलचं काही लोकांना त्यांच मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली आणि त्यांच्याच हस्ते या अल्बमचं उद्‍घाटन करण्याचा एक अभिनव उपक्रम संदीप-सलीलनी या वेळी केला. नेहमीप्रमाणे ही ध्वनीफित Content and Music या दोन्ही पातळ्यांवर फारचं उत्कृष्ट झालेली आहे.
नविनच प्रकाशित झालेल्या या ध्वनीफितीतील गाण्यांवर टाकूयात एक नजर....
(१) बंध मनाचे –
सलीलदादांनी सुरूवातीलाच सुतोवाच केलं की राग ’यमन’ आपल्याला खुप काही देऊन जातो. आपलं भावविश्व समृद्ध करून टाकतो. त्याबदल्यात आपण मात्र या ’यमना’ला काहीही दिलेले नाही.
ही सल जाण्यासाठी, खास कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी ’बंध मनाचे’ ही कविता ’यमन’ रागात स्वरबद्ध केलेली आहे. आणि हा ’यमन’ झालाय मात्र मोठा अद्‍भूत...व्हायोलीनच्या पहिल्या तुकड्यापासून हे गाणं आपल्याला मोहून टाकायला लागते. शव्दाशब्दातून ठिबकायला लागलेली ’quintessential Saleel Melody’ ऐकणार्‍याला वेडं करायला सुरूवात करते. हळूवारपणाला साद घालत, एकेका श्रुतींचा ठेहराव आपली जादू दाखवू लागतो.
अंतर्‍यातून समेवर येताना तर ’गायक-गीत-श्रोता’ ही त्रिपुटी जणू संपुष्टात येते...राहतो फक्त एक नादाविष्कार...
हे गाणं सलीलदादाच्याच ’क्षणात लपून जाशी’, ’माझे जगणे होते गाणे’, ’अताशा असे हे मला काय होते’, ’दूर नभाच्या पल्याड कोणी’ किंवा ’लागते अनाम ओढ श्वासांना’ या भावविभोर करणार्‍या गीतमालेतील पुढचेच पुष्प जणू... आरंभापासून ते Landing Notes पर्यंत अंतःकरणाला सबाह्य वेढून टाकणारी ही कलाकृती कितीही वेळा ऐकलं तरी आपले कान तृप्त होत नाहीत..
(२) इक्कड राजा –
’निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटातील हे गीत या संचात समाविष्ट करण्याचं कारण म्हणजे त्यात वापरलेले अनोखे Music Bridges. ’बबन नमन कर’ ’बे चोक आठ’ ’अ आ इ ई’ ’क ला काना का’ ’अ अ अननसाचा’ वगैरे प्राथमिक शाळेत शिकवल्या व गिरवल्या जाणार्‍या गद्य परवचा, चालीच्या अधूनमधून पेरून सलीलने धमाल उडविली आहे. हा मराठीच काय पण कुठल्याही प्रादेशिक भाषेतल्या संगीतामध्ये प्रथमच केला गेलेला एक अनोखा प्रयोग असावा. प्रौढ शिक्षण योजनेच्या बट्ट्याबोळावर गंमतदार पद्धतीने बोट ठेवणारे शब्द संदीपने खुपच मस्त लिहीले आहेत. कोरस आणि Background Score एकदम अफलातून !!! विशेषतः गाण्याच्या शेवटी गायकवृंद या सर्व absurd signatures चा जो एक गोंगाट करतात तो निव्वळ दणदणीत....
(३) जाब तुला कुणी पुसावा –
मी माझ्या आतापर्यंतच्या सांगितीक प्रवासात ऐकलेली सर्वोत्कृष्ट कव्वाली. नेमक पद्धतीने सुफी आविर्भाव उभा करतानाच संगीतकाराने पद्याला जे कवटाळून वर उचलंलेलं आहे तो फक्त अनुभवण्याचाच विषय... पहिल्या दोन ओळीतच आपण पायाने ठेका धरू पाहतो... हाताने ताल देतो... अन् गायल्या जाणार्‍या प्रत्येक शब्दाबरोबर अधिकच विस्मयचकीत होत जातो.... कव्वालीमध्ये शिगोशिग भरलेला गूढार्थ आणि outright अध्यात्म...
“निर्वाताच्या पोकळीतून कशास रचसी नाटक हे?
स्वतःच सारे अभिनेते अन् स्वतःच नाटक बघणारे !
ब्रम्हांडीही मावत नाही, हृदयी माझ्या कसा वसावा?”

Hats Off to Sandip Khare for this spine-chilling choice of words……… ‘त्या फुलांच्या गंधकोषी’ची आठवण व्हावी किंवा एखाद्या Zen कथेचे सार वाटावे असे ताकदवान पण तितकेच प्रत्यंयकारी तत्वज्ञान संदीपच्या लेखणीतून या निमित्ताने उतरले आहे. ही कव्वाली पुढे कित्येक वर्षे रसिकांच्या स्मरणात रहावी अशीचं विलक्षण सुंदर बनली आहे.
(४) देते कोण –
निसर्गाचे इतके विहंगम वर्णन करणारी कविता फार क्वचित पहायला मिळते. परत एकदा, ‘Sandip-The-Great’ on his poetic best !!! कोकणातला आसमंत जणू आपल्या आजूबाजूला जीवंत होतो. याच्या साथीला ’देते कोण’चं अजून एक बलस्थान म्हणजे त्याला सलीलने दिलेली साधीच पण गोंडस चाल..... प्रकृतीच्या संगतीत धुंद झालेल्या आपल्या मनात ही tune झंकारत राहते अन् अविरतपणे एका अकृत्रिम जगाचा आभास देते... चित्रपटात हे गाणे श्रेया घोषालने तर अल्बममध्ये खुद्द सलील कुलकर्णींनी गायले आहे.
(५) चालंलय काय? –
सलीलदादाच्या भाषेत सांगायचे तर ’संत संदीप खरे यांनी रचलेलं हे आधुनिक भारूड’. रोजच्या जीवनातील विसंगती व व्यावहारीक कोडगेपणावर काय ताशेरे ओढले आहेत या रचनेमध्ये !! ’नंदेश उमप’च्या पहाडी आवाजात हे ऐकताना एकीकडे ओठावर हसू तर मनात खोल कुठेतरी अस्वस्थता अन् खदखद अशी विषम अनुभूती देणारे हे गीत नक्कीच उल्लेखनीय आहे.
(६) मी फसलो म्हणुनी –
परत एकदा ’यमन’... यावेळी मात्र तो नवीन अंगलेण्यांसह आपल्या पुढ्यात अवतरतो. अर्थात गेयता तीच... कातरता तीच... अर्थवाही सूरांचं आपल्याला छेडत राहणंही तेचं....
Another नितांत सुंदर composition by Saleel K. …
उल्हास बापटांनी वाजवलेला संतूर तुमच्या आमच्या मनाचा त्वरीत ठाव घेतो.......
दरम्यान संदीपच्या शब्दशृंगाराने नविन परमोच्च बिंदू गाठलेला...
’ती उन्हे रेशमी होती. चांदणे धगीचे होते’, ’आरोहा बिलगायचा तो धीट खुळा अवरोह’ किंवा ’संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते’ असे शब्द फक्त आणि फक्त ’संदीप खरे’च लिहू जाणे.........
(७) वणवा –
हिंदीच्या तोडीस तोड – किंबहुना काहीसं सरंसच – असं हे ’आयटम सॉंग’ संदीप-सलील द्वयीचं निरनिराळ्या genreमधलं अष्टपैलुत्व सिद्ध करायला पुरेसं आहे असं मला वाटतं. आपल्याही नकळत थिरकायला लावणारं हे गाणं म्हणजे अभिजात संगीताने contemporary styleशी केलेलं एक हस्तांदोलन आहे असं मला वाटतं.
(८) दमलेल्या बाबाची कहाणी –
जगाच्या पाठीवर विखुरलेल्या प्रत्येक मराठी संगीतप्रेमीने एव्हाना एकदा तरी ऐकलेले आणि रसिकांच्या काळजाला घरे पाडणारे हे गीत...
बापाची घालमेल, कळवळ, प्रेम, उद्वेग व्यक्त करायला संदीपने योजलेले शब्द पाषाणालाही पाझर फोडतील असेच आहेत. सलीलने त्याभोवती बांधलेली स्वरांची लाजवाब मांदियाळी, भारावलेल्या वातावरणाला सुसंगत अशी humming line, शेवटच्या कडव्यात गायकाचा सूर टीपेला पोहोचलेला असताना समरस झालेल्या श्रोत्यांच्या मनात उठलेला भावनांचा कल्लोळ आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर वाजत राहणारी नखशिखांत थरारून टाकणारी harmony....
प्रत्येकाला कुठली ना कुठली वेगळीच ओळ स्तब्ध करून गेलेली....’दमलेल्या बाबाची कहाणी’ या गाण्याचं हे एक अगदी निराळं गूढ... डोळ्यामधलं ओघळणारं पाणी मात्र इथून-तिथून सारखंच...
अश्रूपात घडवून आणणारी गाणी मराठीत अनेक झाली असतील पण ’द.बा.क.’चं वैशिष्ट्य म्हणजे it creates thought-explosion in your mind… It creates turmoil…. The thick, dense, choked pool of emotions which invariably calls for introspection of our own lives…………..
हे गाणं संदीप-सलीलला मराठी संगीताच्या प्रांगणात अजरामर करून टाकणार यात शंकाच नाही !!! एका भगिनींनी मनोगतात म्हटलं तस्सं ’सुधीर फडके–ग.दी.मा.’ नंतर ’सलील-संदीप’ हीच जोडी... वारसा यथार्थतेने पुढे चालवणारी... रसिकांना हरतर्‍हेने रिझवणारी... कितीतरी जीवनस्पर्शी... आणि नित्यनूतन !!

संगीतातील वैविध्यपुर्ण प्रकार समर्थपणे हाताळणारी, त्याच बरोबरीने निरतिशय श्रवणसुख देणारी अशी ही सी.डी. प्रत्येक गानप्रेमी मराठी रसिकाने आपल्या संग्रही ठेवण्यायोग्य आहे.

Meanwhile, कार्यक्रम सुरूच होता. अचानक एक पावसाची सर येऊन गेली. त्यावर सलीलदादांनी केलेली - थोडे अगोदर सादर केलेल्या गाण्यावर आधारीत - ’आकाशाचं भांडं, पावसाळ्यात सुकतंय, उन्हाळ्यात गळतंय’ चाललंय काय?’ ही उत्स्फुर्त कोटी जबरदस्त दाद मिळवून गेली. शेवटची कव्वाली झाल्यावर मान्यवरांनी निरोपाचा हात जोडला. पण एकही प्रेक्षक उठायला तयार नव्हता. अजून एक अफाट लोकप्रिय गाण्याची सगळेच जण वाट बघत होते – ’डिपाडी डिपांग’.
सांप्रत काळी, कोणताही मराठी गीतांचा कार्यक्रम(मग यात गायक-गायिका कोणीही असोत), विवीध गुणदर्शनाचे प्रयोग, स्नेहसंमेलने, फॅमिली पिकनिक, गाडीत अथवा घरात खेळल्या जाणार्‍या भेंड्या, कोणताही Reality Show किंवा कोणत्याही सार्वजनिक उत्सवामधले celebration हे या ’डिपाडी डिपांग’ शिवाय पुर्ण होतचं नाही.
तमाम महाराष्ट्राने डोक्यावर उचलून धरलेलं हे गाणं प्रचंड लोकाग्रहास्तव सादर केलं गेलं आणि टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात उद्‍घाटन सोहळ्याची सांगता झाली. काहीश्या मंतरलेल्या अवस्थेत परत निघालेल्या समुदायाच्या तोंडी एकच परवलीचा शब्दोच्चार होता ..’चालंलय काय?’....
************************************************************************************