Wednesday, December 23, 2009

सलील-अवधूतच्या विनोदी कॉमेंटस् – भाग १

सारेगमच्या सुरांच्या मैफ़ीलीला साज असतो तो आपले लाडके परीक्षक डॉ. सलील कुलकर्णीअवधूत गुप्ते यांच्या विनोदी शैलीतील टिप्पण्यांचा !!!
एकीकडे परीक्षणातला काटेकोरपणा व गांभीर्य राखत असतानाच वातावरण हलकेफुलके करून टाकणार्‍या दोघांच्याही कॉमेंटस् आपल्याही चेहर्‍यावर मिश्कील हास्य फुलवल्याखेरीज रहात नाहीत.
दोघांच्याही विनोदाची जातकुळी अगदी वेगळी आहे पण दोघेही आपल्या सर्वांना तेवढेच आवडतात.
अवधूतचा रांगडा लाऊड विनोद तर सलीलचा कुसरदार नर्मविनोद......
अवधूतच्या दादी म्हणजे गिरसप्प्याच्या धबधब्यासारखा कोसळणारा वेगवान जलप्रपात तर सलीलचे शेरे म्हणजे शांतपणे पण डौलदार चालणार्‍या नदीने अलगद आणलेला थंडावा.....
अवधूतच्या कॉमेंटस म्हणजे कधी चरचरीत पांढरा रस्सा तर कधी मऊ कुळथाचं पिठलं आणि सलीलच्या कॉमेंटस म्हणजे कधी चितळेंची आंबा बर्फ़ी तर कधी मध्येच आंबटगोड लागणारं साजूक वरण.... अवधूतचा विनोद म्हणजे व्हीवीयन रिचर्ड्सची धुंवाधार फटकेबाजी असेल तर सलीलचे विनोद म्हणजे गुंडाप्पा विश्वनाथची नजाकत....
कधी उपमा, कधी चिमटे, कधी विडंबन, कधी गुदगुल्या, कधी उपहासगर्भता, कधी मनस्वीपणा अश्या विविध अंगानी ही द्वयी आपले मनोरंजन करत आहे. यात ओढूनताणून आणलेली हास्यनिर्मीती नाहीये.

सारेगमच्या प्रवासात घडलेल्या अश्याच काही विनोदी कॉमेंट्‍सचे मी केलेले हे संकलन....
*********************************************************************************
१) सलील – (तुषारच्या ’डौल मोराच्या मानाचा’ वर) मूळ पाककृती असते मोदकाची. पण तिच्या मुलीला तिखट आवडत असते. मग ती त्यात तिखट सारण वगैरे घालते. म्हणजे मूळ पाककृती असते मोदकाची पण सामोसा तयार होतो.

२) सलील – (मोना कामतला) अगदी आल्यापासून तुझ्या चेहर्‍यावर एका ओव्हरमध्ये ३८ रन करायचे आणि ६ बॉलला ६ सिक्सर मारले तरी २ रन कमी पडणार असे भाव होते.

३)अवधूत – (देवकीताईंनी ’ श्वास म्हणजे सूरांचा शृंगार आहे’ हे विधान केल्यावर) ताई, कसं काय सुचतं हो तुम्हाला इतकं छान, छान? आम्हाला म्हणजे वडापावमधली मिरची, फाटलेलं सीटकव्हर, कार्ब्युरेटरमधला कचरा असलंचं काहीतरी सुचतं

४)सलील – (ओंकारला) देवकीताईंनी तू सूरात गातेस असं म्हणणं म्हणजे कैतरीना कैफने तू सुंदर दिसतेस असे म्हणण्यासारखे आहे. *********************************************************************************
अवधूत : अनेक वर्ष मुंबईच्या हायवे वर रिक्शा चालवणा-याला पुण्यातल्या रस्त्यावर रिक्शा चालवता येइल का ??

सलील : पुण्यात रिक्शा आणि तोंड असं कोणीही येउन चालवू नाही शकत ..
*********************************************************************************
अवधूत - (स्वप्नीलचे गाणे झाल्यावर) याला ना लाज वाटत होती असे गाणे म्हणायची. म्हणजे मल्लिका शेरावतही नऊवारी साडी घातल्यावर लाजणार नाही तेवढा हा लाजत होता.

सलील: (सुस्मिरताची वेषभूषा पाहून) इंडोनेशियाची मुलगी मराठी संतसाहित्याचा अभ्यास करायला आल्यासारखी वाटते आहेस

सलील: (उर्मिलाचे गाणे झाल्यावर) ऑस्ट्रेलियाच्या कोचला हेडन बॅटींगला आल्यावर कसे वाटते ना तसे मला तुझं गाणं आल्यावर वाटतं

अवधूत: (उर्मिलाचे गाणे झाल्यावर) आज तू अवधूत गुप्ते नावाच्या क्षुद्र रसिकाची क्रूर हत्या केलीस !!!!
*********************************************************************************
सलीलने उर्मिलाला घड्याळ काढून दिल्यावर अवधूतने विचारले, एक नंबर असलेला चष्मा दिल्यास कुणाला देशील ?
*********************************************************************************
आर्याच्या गाण्यानंतर पल्लवीने या सर्व little champs च्या शैक्षणिक कामगिरी ची स्तुती करताना मुग्धाला परीक्षेत ९८% मिळाल्याचे सांगितल्यावर सलील ची "एवढ्या मार्कांमध्ये २ गरीब मुलं पास झाली असती!" ही comment छान होती!
*********************************************************************************
सलील (पल्लवीला) - तू सारखं सारखं त्या सोफ्याकडे काय हात दाखवतेस? जणू तिथे बसलेल्या त्या मृण्मयीचं स्वयंवर आहे की काय?

सलील - छान पुरणपोळी पण कशी दूध आणि तूपावाचून तिची मजा येत नाही तसे तुझ्या गाण्याचं झालं...

सलील - त्या मायकेल बेव्हनचं कसं असतं तो येतो तेंव्हा नेहमी ४२ बॉलमध्ये ५५ रन अशीच सिच्युएशन असते
*********************************************************************************
सलील - (आश्विनीला) हे तुझं म्हणणं म्हणजे एखाद्याला घरी जेवायला बोलवायचे आणि वाढतानाच म्हणायचे की हे वाढतेय पण चांगलं झालयं की नाही ते माहीत नाही !!

सलील - (अभिलाषाला) तुला आत्त्ता कसं वाटतयं माहीतेय का? शंभर रुपयांची वस्तू बाराशे रुपयाला आपण विकत घेऊन आल्यावर वाटतं तस्सं....
*********************************************************************************
सलील - आता हे दोघेजण बोलल्यानंतर मी बोलायचं म्हणजे.... ते लग्नाच्या रिसेप्शनला शेवटी शेवटी भेटायला येणार्‍या पाहुण्यांना काय बोलायचं असा प्रश्न नवराबायकोला पडतो, तसे...
*********************************************************************************
अवधूत - (स्वरदाला) तुम्ही पुणेकर ना सगळे हसताना देखील विचार करता

सलील - (अवधूतच्या हातवार्‍यांविषयी) मॉंटेसरीतल्या आया विंगेतून जसे हातवारे करून (अभिनय करून दाखवतो) prompting करतात ना, तसा हा अवधूत तुला इशारे करत होता

सलील - (उर्मिलाच्या गाण्यानंतर) आत्ताचं हे गाणं कसं होतं माहीतीये का? सेहवागला जसं off-stumpच्या बाहेर short-pitch ball मिळाला की तो १००% sixer मारतो तसं....

अवधूत - (उर्मिलाच्या गाण्यानंतर) आमच्या घरी ना एक प्रेशर कुकर आहे. सगळ्यांच्याच घरी असतो. आई कधी कधी त्यात भात लावते, डाळ लावते, भाजी लावते, बटाटे शिजवते. पण ज्या दिवशी आम्ही त्यात मटण शिजवतो त्या दिवशी मला त्या कुकरचा उपयोग झाल्यासारखं वाटतं... उर्मिलाचा आवाज म्हणजे प्रेशर कुकर आहे, मटण शिजवण्याचा....

अवधूत - (वादक सत्यजित प्रभूने गाण्याच्या काही ओळी म्हटल्यानंतर) - सत्तू, काय गायलास यार तू.... सॉल्ल्लीड.... सॉल्ल्लीड.... आणि काय ’ये गो ये मैना’ वगैरे एकदम... म्हणजे लग्न झाल्यापासून फार बदललास तू........
*********************************************************************************