Monday, December 28, 2009

घोरपडी, माझे ’रेल्वीय’ जीवन आणि बाळपणीचा काळ सुखाचा

परवा ऑफिसमधून निघालो. मगरपट्टा ते हडपसर पर्यंतचा रस्ता नेहमीप्रमाणे प्रचंड जाम होता. चुकीच्या वेळी ’पुणे-नगर’ हायवेकडून ’पुणे-सोलापुर’ हायवेला intercept करणारे ट्रकवाले, निरनिराळ्या कंपनीच्या बसेस आणि कॅबस्, बेशिस्त रिक्षावाले, मोकाट दुचाकीवाले आणि एकंदरीतच डोके आणि patience कमी असणारे विविध प्रकारचे वाहनचालक यांच्यामुळे (आमच्या पुणेरी भाषेत सांगायचे तर) ‘फुलस्केल राडा’ झाला होता. ते पाहून आमच्या ड्रायव्हरने कुणाला फारश्या माहीत नसलेल्या पाठीमागच्या रोडने गाडी दामटली. अतिशय शांत आणि रहदारी नसलेल्या त्या रस्त्यावर गाडीने एका वळणावर गिरकी घेतली. समोर पाटी दिसली - ’घोरपडी’.
मन एकदम कित्येक वर्ष पाठीमागे, भूतकाळात गेलं... कितीतरी आठवणी तरळू लागल्या....
’घोरपडी’ या पुण्यातीलचं छोट्याश्या गावाचा आणि माझा ऋणानुबंध काही आगळाचं....तसं पाहिलं तर पुण्यातला अगदी आडवाटेचा हा भाग... फक्त मिलिटरी आणि रेल्वेसाठी प्रसिद्ध असलेला... पण लहानपणीच्या अनेक सुट्ट्या या घोरपडीत गेलेल्या.... घोरपडीशी एक वेगळचं सख्य निर्माण झालेलं...
*****************************************************************************************
’घोरपडी’ रेल्वे कॉलनी
घोरपडीमध्ये एक भली मोठी रेल्वे कॉलनी आहे. माझा मामा घोरपडीचा ’यार्ड मास्तर’ होता. या कॉलनीच्या शेवटच्या घरात रहायचा तो. रेल्वेविषयी अतोनात आवड मला निर्माण झाली ती इथूनच.....मला ते दिवस पुन्हा आठवू लागले.
सुट्टीत त्या घोरपडीच्या बस-स्टॉपवर उतरलं की कोण आनंद व्हायचा. एकसारख्या दिसणार्‍या त्या घरांच्या जंजाळात आपल्याला कुठल्या लेन मध्ये जायचं आहे हे पटकन् लक्षातचं यायचं नाही......
सर्वप्रथम दिसायची ती त्या कॉलनीच्या तोंडाशी असलेली एक बेकरी. पुढचे काही दिवस त्या बेकरीत मिळणारे क्रीम-रोल, गुलाबी रंगाचा केक, लोणी लावलेला पाव वगैरे पदार्थ खाणे ही आमच्यासाठी एक मोठी चैनच असायची.
अतिशय नेटकी आणि टुमदार पद्धतीने बांधलेली ती बैठी घरं... प्रत्येक घराभोवती कुंपण आणि ज्याने त्याने आपापल्या शक्तीबुद्धी नुसार बाग जोपासलेली बाग.... कुंपणाला असलेलं लोखंडी पट्ट्यांचं गेट.... हे गेट म्हणजे एक कमाल असायची... सोलापुरपासून मुंबई पर्यंत मध्य रेल्वेच्या कुठल्याही कॉलनीत गेलं असता याच धाटणीचं गेट पहायला मिळतं. रेल्वेवाल्यांच्या या Standardizationचं मात्र कौतुक करायला हवं..
’घोरपडी’ रेल्वे कॉलनीतली काही कुटुंब कुत्री पाळायची.. मग अशी घरं टाळत आपला रस्ता चोखाळायचा...
इथे बहुसंख्य लोकवस्ती दाक्षिणात्य लोकांची... मराठी घरं तुलनेनं कमी.... पण गंमत म्हणजे हे सगळे एका विशिष्ट पद्धतीनं मराठी बोलायचे...
बाकी वसाहत एकदम सुबक..... अगदी एखाद्या मॉडेलमध्ये लावावीत किंवा चित्रात काढावीत अश्या काटेकोर रचनेमध्ये बांधलेली आणि मेंटेन केलेली घरं..
*****************************************************************************************
प्रथम तुज पाहता......
उभ्या गल्लीच्या अंताला पोहोचले की दोन घरांच्या मधून मला रेल्वेचं प्रथम दर्शन व्ह्यायचं. थोड्याश्या चढावर असलेले ते लोखंडी रूळ दुरूनही चकचकीत दिसायचे. त्याला लावलेल्या sleepers, ते जॉईंट बोल्ट, दोन स्वतंत्र मार्गांच्या मध्ये असलेला एकमेच सिग्नलचा खांब दिसला की आपण घोरपडीत आल्याची जाणीव व्ह्यायची. वेध लागायचे कोणत्याही एका गाडीच्या आगमनाचे. ह्यासाठी मात्र मला कधीच प्रतिक्षा करावी लागली नाही.
अजून त्या डेड एंडला पोहोचेतो न पोहोचतो तोच ...अतिशय रोमांचित करणार्‍या तालात, त्या सुप्रसिद्ध ’अल्को एक्झॉस्ट’ (Alco Exhaust) च्या धूरात डब्यांचे ओझे वाहणारे WDM सिरीजचे डिझेल इंजिन दिसायचे अन् माझ्या आनंदाला पारावार उरायचा नाही. जागच्या जागी खिळून मी त्या पहिल्यावहिल्या रेल्वेचा पुरेपुर आनंद घ्यायचो. घोरपडीतल्या सुट्टीची अशी मोठी मनोहर सुरुवात व्ह्यायची.....
*****************************************************************************************
मन लोभले, मन मोहने......
घरात येवून स्थिरस्थावर होईपर्यंत पुढच्या गाडीची वेळ झालेली असायची. आता कानही सरावलेले असायचे. डिझेल इंजिनाचा तो विशीष्ट ध्वनी दूरवरून अस्फूटपणे येउ लागायचा आणि मी जीवाच्या आकांताने बाहेर धूम ठोकायचो.
मामाच्या घरासमोर रस्त्यावर थोडेसे कडेला जरी येऊन थांबले तरी गाड्यांची वाहतूक पुर्ण दिसायची. पण असल्या गोष्टींमध्ये संतोष पावण्याचे ते दिवस नव्हते.
मी आणि माझ्याबरोबर येण्यास उत्सुक असेल तर कोणी भावंडं असे सर्वजण छोट्याश्या वाटेने थेट मुख्य लोहमार्गापाशी जायचो. मग सुरू व्ह्यायचा एक हवाहवासा वाटणारा आविष्कार – भारतीय रेल्वेच्या अभिजात सौंदर्याचा !! गाडी थोडी दूर असतानाचा रूळांना कंप सुटायचा. सिग्नल हिरवा झालेला असायचा. पुण्याहून दक्षिण भारतात जाणारा हा प्रमुख लोहमार्ग असल्याने एकापेक्षा एक सरस ट्रेन इथून जायच्या. दूरवर अतिशय मनमोहक असे इंजिनाचे रूप दिसायला लागायचे. त्याच्याभोवती वेगामुळे तयार झालेले हवेचे एक सुंदर कोंदण असायचे. आजूबाजूची माती, पालापाचोळा, कागदाचे कपटे उडवत मोठ्या डौलदार आणि दिमाखदार पद्धतीने गाडी जवळ येऊ लागायची. आता इंजिनचा आवाज आणि पाठीमागे डब्यांचा लयदार रिदम स्पष्टपणे वेगवेगळा ऐकू यायचा.
Acceleration द्यायच्या वेळी इंजिन धूर सोडायचे. तो एक पाहण्यालायक मोठा अनुपम्य सोहळा असतो. ’अल्को एक्झॉस्ट’चा गंध वेड लावणारा तर असायचाच पण त्याहूनही विलक्षण प्रेक्षणीय असायची ती इंजिन सोडत असलेली घनदाट, वर्तुळाकार वलयं.... त्यावेळी इंजिनाचा स्वरही थोडासा बदललेला असायचा. एखाद्या रूबाबदार, तेजस्वी कांतीच्या, भरघोस पोषणाने धष्टपुष्ट झालेल्या अरबी घोड्याने जोरजोरात फुदकावं, मोठ्या आवेशात खिंकाळावं तशी अनाहूत आक्रमकता मला त्या इंजिनाच्या ठिकाणी त्यावेळी दिसायची.
*****************************************************************************************
तू जीवनगाणे गावे....मी स्वरात चिंब भिजावे
कधीकधी आमच्या इथून जाताना ड्रायव्हर हॉर्न वाजवायचे. धुंद करून टाकणारा हा सुमधूर सूर मला थेट आत जाऊन भिडायचा. कधी निष्णात गायकाने ’सा’ लावावा तसा एकच हलका हॉर्न....कधी लाटांसारखा उचंबळणारा वेगवेगळ्या तीव्रतेचा repetitive हॉर्न.....कधी घट्ट रूतल्यासारखा वाजणारा Powerfull alarming हॉर्न तर कधी आसमंतात रेंगाळणारा दीर्घ पण एकाच लयीतला हॉर्न... रेल्वे इंजिनाच्या शिट्ट्यांच्या या सुरेल मैफीलीत मी पुर्णपणे हरवून जायचो.
रेल्वेच्या अद्‍भूत विश्वातील इतरही अनेक नाद मी त्या काळात notice केले आणि अंतःकरणात साठवून ठेवले. इंजिन थांबल्या जागेवरून चालणे सुरू करताना धूरांच्या भपक्याबरोबर येणारा भात्यासारख्या muscular आवाज, लांबलचक अश्या मालगाडीने Locomotive ब्रेक लावल्यानंतर त्या प्रत्येक वाघिणीच्या Pneumatic Line मधून apply होणार्‍या Individual brakesचा खर्ज, रूळ आणि चाकांमधलं घर्षण, सांधे बदलताना होणारा खडखडाट, गाडी नाल्याच्या किंवा सब-वेच्या पुलावरून जाताना होणारा हवेचा गुंजारव.... एक ना अनेक सूर आणि त्यातून फुलाफुलाने उमटत जाणारी रेल्वेची मनोज्ञ प्रतिमा....
*****************************************************************************************
मामाचं घर
रेल्वे कॉलनीच्या अगदी टोकाला मामाचे घर होते. घराच्या नंतर एक मोठे पटांगण आणि त्यानंतर Central railway Training Institute ची लायब्ररी. मामाच्या घराची रचनाही मोठी वैशिष्ट्यपुर्ण होती. रेल्वे क्वार्टर बांधताना मायबाप सरकारने मोठी सौंदर्यदृष्टी जपली आहे बहुधा......पुढच्या बाजूस एक मोठाली पडवी. मग प्रशस्त बैठकीची खोली. उजव्या बाजूस तितकेच ऐसपैस स्वयंपाकघर. पाठीमागे दोन मोठाल्या कोठ्या. मिनी बेडरूम म्हणता येईल अश्या या दोन खोल्यांचा लोक आपापल्या गरजेनुसार कल्पक उपयोग करून घ्यायचे. आजकालचा एखादा वन-आर-के फ्लॅट बसेल एवढी मोठाली पाठीमागची पडवी. त्याच्या भिंतींना बांबूची कलाकुसरी केलेलं पार्टिशन.
कमाल म्हणजे जेवढे मोठे घर जवळपास तेवढेच मोठे पाठीमागचे अंगण.
कर्मचार्‍यांना ऐसपैस जागा आणि खेड्यातल्या घरांचा फील यावा अशी रेल्वे महामंडळाची योजना असावी बहुतेक !!!!
या विस्तीर्ण परसदारी लगेच लक्षात येण्यासारख्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे अंगणात एखाद्या शांत, गंभीर योग्यासारखं अविचल उभं असलेलं उंबराचं झाड आणि कमरेइतक्या उंचीचा एक पाणी साठवण्याचा हौद.
स्विमींग टॅंक ही कल्पना रूजली नव्हती त्या काळात मला या छोटेखानी हौदाचं फार आकर्षण वाटायचं. अर्थात चार फूट बाय चार फूट आकाराच्या त्या हौदात मी कधीच मावणार नाही हे सत्य मला फार लवकर उमगलं. पण कधी काळी या हौदात, तीर्थक्षेत्रांच्या कुंडात उतरून करतात तशी आंघोळ करायची माझी फार इच्छा होती ;-)
रेल्वेने आपल्या कर्मचार्‍यांच्या राहणीमानाला दिलेला अजून एक रस्टीक टच् म्हणजे परसांगणाच्या अगदी टोकाला असलेलं हवेशीर शौचालय. टिपीकली फक्त रेल्वे कॉलन्यांमध्येच बघायला मिळणारं हे डिझाईन, रात्रीच्या वेळी मात्र, तिकडे जाण्यासाठी आक्रमावा लागणार्‍या लांबलचक मार्गामुळे फार भीतीदायक वाटायचं !!!
*****************************************************************************************
अनामवीरा....
क्वचित केंव्हातरी आमचा बालसुलभ उत्साह पाहून ड्रायव्हर लोक आम्हाला हात हलवून अभिवादन करायचे. अंगात दुपट्टीचं बळ यायचं आणि केवढातरी उत्साह संचारायचा. रेल्वे ड्रायव्हर या जमातीविषयी मला अतीव आदर आणि एक अनामिक आकर्षण आहे. एवढी मोठी गाडी अश्या दमदार पद्धतीने, न थकता, न कंटाळता पळवणार्‍या या चालकदादांच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र एखाद्या निष्काम कर्मयोग्यासारखे भासतात. भारतातल्या जवळपास सर्व लहान मुलांना मोठेपणी इंजिन ड्रायव्हर व्ह्यायचं असतं. त्याचं ते नॉच ओढून गाडीला वेग देणं, बावटा फडकवणं, केबिन क्रॉस करताना सलामी देणं, विशिष्ट जागा आली की शिट्ट्यांची ललकारी देणं.... सगळं कसं एका दिमाखात.... सगळ्याला एक वेगळीच स्टाईल...
*****************************************************************************************
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे.....
माझ्या रेल्वेदर्शनाला कसल्याही नियमांची चौकट वा आवडीनिवडीचं फारसं कुंपण नसायचं..
पॅसिंजर असो वा एक्सप्रेस, वाघिणी वाहून नेणारी मालगाडी असो किंवा Not To Be Loose Shuntedचे गोल टॅंकर...
प्रत्येकाचा आनंद काही निराळाच व तो मी तितक्याच रसिकतेने घ्यायचो...प्रमुख मार्ग असल्याने घोरपडीला रेल्वेगाड्यांची गजबज फार... वर म्हटल्याप्रमाणे, फार काळ वाट कधी पहायला लागायची नाही. डब्यांना वापरलेल्या रंगसंगतीवरून ही गाडी मध्य रेल्वेची आहे का दक्षिण-मध्य विभागाची आहे वगैरे गोष्टी नंतरनंतर सवयीने कळू लागल्या. तर इंजिनाचे नंबर लक्षात ठेवून त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी तेच इंजिन डाऊन ट्रेनला वापरले गेले तर त्याचे हूड बरोबर आहे का हे ठरवून चेक करायला गंमत यायची. पुण्याला Rotating Table नाही आणि मुंबई CST हा तर Dead-End आहे हे पक्के माहीत होते त्यामुळे एखादी अप गाडी पुणे स्थानकाकडे Short Hood ने गेली तर ते इंजिन कोणत्याही डाऊन गाडीला Long Hoodनेच वापरले जायचे हे अनुमान काढायला काहीच वेळ लागला नाही.
मला व्यक्तीशः मात्र अजूनही Long Hood positionमधले इंजिनच जास्त भावते. त्याची मजा काही औरच. Short Hoodने डबे ओढणारे इंजिन म्हणजे नविन लग्न झालेलं असूनही पहिल्या दिवसापासून सासरी खस्ता खाणार्‍या गरीब सूनेसारखे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त कष्टाचा देखावा निर्माण करणार्‍या या प्रकारापेक्षा अतिशय राजबिंड्या आणि प्रमाणबद्ध भावमुद्रेतले Long Hood कितीतरी देखणे !!!
*****************************************************************************************
सहज सख्या एकटाच....येई सांजवेळी...
क्वचित केंव्हा केंव्हा एखादे नुसतेच इंजिन शंटींगसाठी किंवा इतर काही कारणास्तव एकटेच तिकडे यायचे. तेंव्हा अगदी जवळ जाऊन चारी बाजूंनी ते निरखता यायचे. फार गयावया केल्यानंतर एखाद्या सहृदय चालकाला आमची दया यायची अन् तो आम्हाला वर केबिनमध्ये प्रवेशाची अनुमती द्यायचा.
काय अपरिमीत आनंद व्हायचा तेंव्हा.....
मेन ड्रायव्हींग सीट म्हणजे एक ३६० अंशात फिरणारी गोलाकार खुर्ची असते. त्याच्यावर बसून समोरच्या काचेतून पाहिले की अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे विहंगम दृश्य दिसायचे. दूरवरचा तो लुकलुकणारा सिग्नल, समांतर पुढे-पुढे गेलेले रूळ, काही अंतरावर एकमेकांमध्ये गुंतलेल्या अनेक लाईन्सचे जंजाळ, यार्डमध्ये एखाद्या निवांत थांबलेल्या रेल्वेच्या शेवटच्या डब्यावरील ’X’ ची खूण, दुपार असेल तर आपल्या नजरेसमोर लांबवर परंतु त्याच लोहमार्गावर दिसणारा मृगजळाचा आभास... सगळं कसं रम्य आणि आकर्षक !! इंजिनचालकाच्या त्या आसनावर बसून बाहेर पहायला लागलं की मला मोठ्या चक्रवर्ती सम्राटाच्या राजसिंहासनावर बसल्यावर जी कृतार्थता प्राप्त होईल तसा फ़ील यायचा. हॉर्न वाजवताना मात्र जीव मेटाकुटीला यायचा. डिझेल इंजिनचे हॉर्न हे Spring Type असतात. भयंकर ताकद लावून दाबले तरच त्याला कंठ फुटतो हा शोध अल्पावधीतच मला लागल्याने पुढे रेल्वेने प्रवास करताना ’सी/फा’ किंवा ’W/L’ (अर्थात Whistle Level-Crossing) अशी पाटी दिसली की ड्रायव्हरला पडणार्‍या कष्टाची जाणीव होऊ लागली.
*****************************************************************************************
क्रॉसिंगचा थरार
दुपारच्या काळात खुप कमी झालेली गाड्यांची वर्दळ सूर्य कलायला लागला की वाढायची. मावळत्या दिनकराच्या साक्षीने आमचा रेल्वेनंदाचा पुढचा अध्याय सुरू व्ह्यायचा. बाकी काही खेळ खेळणे, फिरायला किंवा बाहेर खायला जाणे, टी.व्ही. पाहणे या सर्वांपेक्षा असं तासन्‍तास रूळांवर चालणारं हे रम्य नाट्य बघण्यातचं मला खरा रस असायचा. कधीतरी मोठा भाग्योदय व्हायचा अन्‍ दोन गाड्यांचं समोरासमोर crossing पहायला मिळायचं. हा मणिकांचन, दुग्धशर्करा वगैरे म्हणतात तसा अपूर्व योग घोरपडीच्या वास्तव्यात यावा अशी मी मनोमन प्रार्थना करत असायचोचं. बर्‍यापैकी वेगात असलेल्या दोन रूबाबदार गाड्या अगदी Heads-On cross करताना त्रयस्थ म्हणून पाहण्यासारखं सुख नाही... एकदम लाजवाब....विशेषतः दोन्ही गाड्यांची इंजिने परस्परांना ओलांडताना जो एक शिट्टीचा आगळावेगळा हुंकार देतात त्याने
कुठल्याही अस्सल रेल्वेप्रेमी व्यक्तीच्या अंगावर रोमांच उभे राहतील.
*****************************************************************************************
उपसंहार
दिवसरात्र अश्या वेधक कार्यक्रमात घालवत असतानाच सुट्टीचे चार दिवस भुर्रकन कधी उडून जायचे तेच कळायचं नाही. घरी जाण्याचा दिवस येऊन ठेपायचा. शाळेपाशी असलेल्या बसस्टॉपवर परतीच्या प्रवासाला सुरूवात करायच्या आधी मी मात्र मागे डोकावून पहात रहायचो. एखादी झलक... एखादा तरी धावत्या आगगाडीचा तो कानात न सामावणारा typical नाद.... पुढे कितीतरी दिवस लागायचे या बेहोशीतून बाहेर यायला !!!
खरचं, ’घोरपडी’मध्ये व्यतीत केलेल्या या सुट्ट्या म्हणजे माझं भावजीवन समृद्ध करणारा काळ होता.
मधल्या काळात जग कितीतरी बदललं... वाढत्या वयाने सोबत्यांसारखे असलेले अनेक छंद हिरावून नेले.... पुलाखालून बरंचं पाणी वाहून गेलं.... मामा सेवानिवृत्त झाला आणि त्याचबरोबर त्याने ती कॉलनीही सोडली.
आमचा व घोरपडीचा संबंध संपला. आता तिकडे जाणं नाही अन् ते रमणंही नाही.
पण आजही...व्यावहारीक बंधनांमध्ये करकचून गेले असताना क्वचित कधीतरी...एखाद्या निष्पर्ण शांत दुपारी... लांब दूरवर आगगाडीचा आवाज ऐकू येतो अन् मन परत अस्वस्थ होतं.... अजूनही केंव्हा ऑफीसची गाडी त्या दिशेने वळते.... भूतकाळाचा कल्लोळ उठतो. आपल्या मुग्धानी जसं तिच्या एका बहारदार गीतात म्हटलयं ना –
“आठवणींच्या आधी जाते, जिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू”
’घोरपडी’, ते कौलारू घर आणि अहोरात्र चालणारा ’रेल्वोत्सव’... सगळंच कुठेतरी तळात खोलवर जाऊन बसलयं !!!!!!!!