Thursday, November 12, 2009

काळ देहासी आला खाऊ...

सकाळी ऑफिसला जायला निघालो तेवढ्यात एका बालमित्राचा फोन आला – एक सुन्न करणारी बातमी घेऊन !!
आमचा एक शाळासोबती आणि मित्र – अमित – heart attack ने गेला:( .. क्षणभर काहीच सुचेनासे झाले. चार-पाच महिन्यांपुर्वी वैभव स्वारगेटजवळ अपघातात गेला आणि आता अमित हा असा.... आपल्याच वयाचे हे तरूण अश्या पद्धतीने जातात ही गोष्ट खुप अंतर्मुख करून गेली.
भगवंत त्याला चांगली गती देवो... त्याच्या पत्नीला, त्याच्या लहान बाळाला, त्याचा पालकांना या कधीही भरून न येणार्‍या जखमेतून सावरण्याची शक्ती देवो.....
असं म्हणतात की only certain thing in life in death !!!
’मृत्यू’ या दोन अक्षरात केवढं साठवलयं ना? जन्माला आल्यापासून खरेतर प्रत्येक पावलावर ही मरणाची सावली कायम आपल्या बरोबर असते. कधी आपण realize करतो, कधी नाही..
ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचे तर “जेथ मंगळाच्या अंकुरी।सवेचि अमंगळाचि पडे पारी। मृत्यू उदराच्या परिवरी।गर्भु गिवसी॥”....
प्रत्येकाची जाण्याची वेळ आणि ठिकाण ठरलेलं... पण त्याचा suspense यमदेवतेनं अगदी निष्णातपणे maintain केलेला...तिशीच्या आतला धडधाकट, आनंदी माणूस हृदय बंद पडून जाईल अशी कल्पना तरी कुणी करू शकेल का?
पूर्वसूचना न देता, आगंतुक पाहुण्यासारखं येणं हा मृत्यूभाऊंचा आवडता उपक्रम असावा..... खरेतर तो असतो फक्त एका क्षणाचाच खेळ – होत्याचं नव्हतं करून टाकणारा, वर्तमान-भविष्य उडवून टाकून एक फक्त भूतकाळ उरवणारा, पार्थिवाच्या पलीकडे घेऊन जाणारा, व्यक्तातून अव्यक्तात नेणारा..... आणि गंमत म्हणजे १०० पैकी ९० लोक याच्यासाठी तयार नसतात किंवा या चीरमिलनाच्या क्षणाच्या अनामिक दहशतीखाली आधीचे कित्येक क्षण वाया घालवतात...
’मरणाचे स्मरण असावे।हरीभक्तीस सादर व्हावे।’ हा एकनाथ महाराजांचा उपदेश हा भयातून किंवा असहाय्यतेतून आलेला नसून जीवनाच्या सगळ्यात मोठ्या सत्याकडे डोळे उघडे ठेवून पहायला शिकवणारा आहे !!!
World was never so uncertain before…. कोणत्याही वयाचे, कोणत्याही backgroundचे लोक सोडून जाउ लागले आहेत...जीवनाच महत्व आणि त्याला समृद्ध करण्याची आवश्यकता कळण्यासाठी मरणाची अपरिहार्यता, त्याचं विक्राळ स्वरूप आणि त्याची निजनिकट साथसंगत कळणे आवश्यक आहे. परत एकदा ज्ञानोबा आठवतात –
“बाप दुःखाचे केणे सुटले।तेथ मरणाचे भरे लोटले।
ऐसे मृत्युलोकींचे शेवटीले।येणे जाहले हाटवेळे॥
आता सुखेसी जीविता।केंची ग्राहिकी कीजेल पंडुसुता।
काय राखोंडी फुंकिता।दीपु लागे॥
अगा विषाचे कांदे वाटुनि।रसु घेईजे पिळुनी।
तया नाम अमर ठेविनि।जैसे अमर होणे॥
जिये लोकींचा चंद्रही क्षयरोगी।जेथ उदयो होय अस्तालागी।
दुःख लेवुनी सुखाची आंगी।सळीत जगाते॥“

मग मरणाच्या लपेटमध्ये सापडलेल्या बापड्या मानवी जीवांना आश्वस्त करणारी भगवान श्रीकृष्णांची ओवी –
“अहा कटकटा हे वोखटे।इये मृत्युलोकींचे उफराटे।
अर्जुना येथ जरी अवचटे।जन्मलासी तू॥
तरी झडझडोनी वहिला निघ।इया भक्तीचिया वाटा लाग।
जिया पावसी अव्यंग।निजधाम माझे॥“