Monday, October 26, 2009

गाभ्रीचा पाऊस...

बर्‍याच महिन्यांनी थिएटरची पायरी चढली ते एका मित्रवर्यांच्या विनंतीला मान देऊन. ’गाभ्रीचा पाऊस’ हा चित्रपट नक्की पहा असा निरोप जवळपास रोज त्याच्या निर्मात्याकडून माझ्या मित्रांना मिळत होता. मला एकतर चित्रपटांबद्दल कमालीची अनुत्सुकता आणि चित्रपटगृहात जायचा भयंकर कंटाळा. त्यामुळे मुहुर्त काही लागत नव्हता. शेवटी परवा मला बकोटीला धरून त्यांनी ’प्रभात’ गाठलं.. आणि काय सांगू महाराजा???
दोन तास अतिशय समरस होऊन गेलो. इतका नितांतसुंदर पण वास्तवदर्शी चित्रपट मराठीत निर्माण झाला हेच आश्चर्य आहे. ’शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ हा मुख्य विषय असला तरी याची मांडणी आपल्यासारख्या शहरी दर्शकांना अंतर्मुख करणारी आहे. अमरावतीजवळच्या एका खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात घडणारी ही कथा हृदयाला चटका लावून जाते.
निसर्ग एखाद्याच्या जीवनात कसे खेळ खेळतो याचे विदारक पण प्रत्ययंकारी चित्रण, बटबटीतपणा व नेहमीचा emotional drama टाळून अतिशय नेमकेपणाने केले आहे.
बघताना कुठेतरी आत काळजाला चटका लावून जाणारी ’क्रीस्ना’ नावाच्या शेतकर्‍याची ही कथा भारत नावाच्या कृषीप्रधान देशातील आणि महाराष्ट्र नावाच्या शेतकरी राज्यातील भीषण वास्तवावर अचूक बोट ठेवते.
सध्या देश-विदेशातील Film Festival मध्ये गाजत असलेला हा चित्रपट संवेदनाक्षम प्रेक्षकांनी जरूर पहावा.