Monday, October 5, 2009

’आयुष्यावर बोलू काही’ मध्ये मुग्धा वैशंपायन

पुन्हा एकदा मुग्धाचे ’हुरहुर असते तीच उरी...’
शनिवार, दि. ३-ऑक्टोबर-२००९,
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अलिबागमध्ये संदीप-सलीलचा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम ’आयुष्यावर बोलू काही’ आयोजित केला गेला होता. अवेळी आलेल्या पावसाने प्रेक्षकांची व संयोजकांची थोडीशी तारांबळ उडाली पण कुणाचाही उत्साह कमी झाला नाही. चढत्या वाढत्या भाजणीने रंगत गेलेल्या या कार्यक्रमावर कळस चढवला तो आपल्या लाडक्या मुग्धाच्या थरारक सादरीकरणाने !!!!
अगदी ऐनवेळी ठरल्यानुसार तिने डॉ. सलील कुलकर्णींनी कंपोज केलेले ’हुरहुर असते’ हे तिचे खास ठेवणीतले अन्‌ आवडते गीत गायले. मुग्धाचे स्वर नेहमीप्रमाणे अतिशय अप्रतिम लागले. ’हुरहुर असते’ या पहिल्याच शव्दात तिने इतका भाव ओतला की श्रोते हलून गेले. गाण्यातील आव्हानात्मक जागा नेहमीच्याच शिताफीने आणि सुरेलपणे घेत मुग्धाने ती इतक्या कौतुकाला व अमाप लोकप्रियतेला का पात्र आहे हे परत एकदा दाखवून दिले.
काल या गीतामधून मुग्धाच्या गायनाच्या जाणवलेल्या काही उल्लेखनीय गोष्टी खालीलप्रमाणे-
1. कमालीचे स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार
2. एकेका श्रुतीचा लहेजा सांभाळत ती नेमकेपणे उलगडून दाखवण्याची शैली
3. रोवल्यासारखे येणारे खर्जातले स्टेडी सूर (उदा. ’कुठला रस्ता’, ’जगणे मरणे’)
4. गेयता अजिबात ढळू न देता लावलेल्या शार्प वरच्या नोटस्‍
5. श्वासावरचे आश्चर्यजनक नियंत्रण
6. शब्दाशब्दातून व्यक्त होणारी विलक्षण भावगर्भता


मला तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे हे गाणं थेट ऐकता आलं. आधी म्हटल्याप्रमाणे मुग्धाची कला दिवसेंदिवस सशक्त व परिपुर्ण होते आहे. तिचा अभ्यास श्रोत्यांच्या लक्षात आल्याखेरीज रहात नाही. कालही तसेच झाले असणार. अलिबागकरांना मुग्धाच्या आवाजाची ही अनपेक्षितपणे मिळालेली मैफील त्यांचा कोजागिरीचा आनंद शतपटीने वाढवून गेली असणार यात शंकाच नाही. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित असणार्‍यांनी आपले अनुभव कृपया शेअर करावेत.
ता.क. – बर्‍याच दिवसांपुर्वी मुग्धाचे ’हुरहुर असते’ सारेगम मध्ये ऐकून मी एक लेख लिहिला होता. त्याची लिंक इथे देत आहे. तोही अवश्य वाचणे.
http://vikrantdeshmukh.blogspot.com/2009/04/blog-post_26.html