Friday, September 4, 2009

असं कधी झालंयं तुम्हाला?

१) तुम्ही सुर्योदय पाहता आहात अन् एकदम तुमच्या मनात परमात्म्याविषयी कृतज्ञता दाटून आली.
२) पावसाचे पहिले थेंब तुमच्या अंगावर पडले व तुम्ही एकदम मोहरून गेलात.
३) भर माध्यान्ही बाहेरचे उन बघत असताना एक सुमधूर सूर तुमच्या कानी पडला व त्या आवाजातील जादूने तुमच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले.
४) आपला राष्ट्रध्वज वार्‍यावर मोठ्या डौलाने फडकत असलेला पाहिलात अन् तुम्हाला प्रचंड भरून आलं
५) नीरव अश्या आसमंतात तुम्हाला तुमच्याच श्वासांचा लयबद्ध न्यास जाणवला व तुम्ही त्यात हरवून गेलात.
६) पांढर्‍या शुभ्र चांदराती थंड हवेची झुळूक आली. त्यात तुम्ही तन-मन विसरून गेलात.
७) माळरानातून शीळ घालत जाणारी वेगवान रेल्वेगाडी दिसली अन् तुम्ही अगदी लहान मुलांप्रमाणे भान विसरून त्याकडे बघतचं बसलात.
८) अंथरूणाला पाठ टेकवून पडल्यावर कुठेतरी दूरवरून वाद्याची लकेर ऐकू आली. आजूबाजूच्या जगाची जाणिव हळूहळू नाहिशी होत गेली. तुम्हाला वाटू लागलं की या संगीतातच आपला शेवट होवून जावा.
९) एखादे लिखाण वाचता वाचता डोळ्यातून अश्रूंचे पाट वाहू लागले. समोरचे शब्द दिसेनासे झाले.
१०) एखाद्या माणसाच्या चेहर्‍यावरचे करूण भाव तुम्हाला काही कारण नसताना रात्रंदिवस छळत राहिले.
११) एका रिक्त संध्याकाळी तुम्हाला एक विलक्षण स्तब्धता प्राप्त झाली. आपल्याच आत जावेसे वाटू लागले.
१२) कोण्या एकाच्या आठवणीने तुमचे हृदय अगदी पिळवटून निघाले. शब्द, भाव, संवेदना सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तो विरह जीवाला कमालीचा बैचेन करून गेला.
१३) एखादी घटना किंवा प्रसंग घडल्यावर प्रकर्षाने वाटलं की अगदी असाच प्रसंग तुमच्या आयुष्यात पुर्वी कधीतरी घडून गेलाय. पण काही केल्या त्या अद्‍भूत अनुभवाचा माग लागेना.
१४) तुम्हाला खुप प्रश्न पडले – जगाबद्दल, निसर्गाबद्दल, जीवनाबद्दल, मृत्यूबद्दल, तुमच्या अस्तित्वाबद्दल.