Saturday, August 29, 2009

हृदयामधले गाणे

संदीपच्या कविता, डॉ. सलील कुलकर्णींचे संगीत व बेला शेंडेचा सुमधूर आवाज असा त्रिवेणी संगम असलेला नविन अल्बम ’हृदयामधले गाणे’ नुकताच ऐकला. वेड लागायचं बाकी रहावं इतकी अप्रतिम झालीयं ही ध्वनीफीत !!! संदिप-सलीलच्या नव्या सीडीज् या म्युझिक स्टोअर मध्ये नेहमीच ’आउट ऑफ स्टॉक’ असतात. मला मोठ्या प्रयत्नाने मागच्या आठवड्यात ही गाणी मिळाली. झपाटल्यासारख्या ऐकत गेलो. एकदा ऐकून काहीचं तृप्ती होईना. दिवसभर मोबाईलवर, लॅपटॉपवर तेच चालू होते. अत्युच्च दर्जाचे संगीत, विलक्षण ताकदीचे शब्द अन्‌‍ त्याला बेलाच्या गोड गळ्याचा साज म्हणजे दर्दी संगीत रसिकांना पर्वणीचं !!
सलीलच्या संगीताने प्रत्येकवेळी नवनवी शिखरे पादाक्रांत करायचे ठरवलेय बहुधा. त्यांची प्रत्येक नवी compositions ही आधीच्यापेक्षा काकणभर सरस असतात. श्रोते ’संधीप्रकाशात’च्या समाधीतून बाहेर पडायच्या आतचं ’हृदयामधले गाणे’ चे गारूड संमोहीत करायला सज्ज झालंयं.
सलीलच्या संगीतशैलीबद्दल लोकांना जशी एक कमालीची उत्सुकता आहे तशीच त्याच्या अष्टपैलुत्वाबद्दल आदरही आहे. ’प्रेमात म्हणे’ चा South Indian rhythm किंवा ’तव नयनांचे दल’ मधला नाट्यसंगीताचा बाज किंवा ’माझे जगणे होते गाणे’ ची आर्तता किंवा ’नसतेस घरी तू जेंव्हा’ मधली evergreen भैरवी किंवा अफाट लोकप्रियतेचा कळस गाठलेलं ’डिपाडी डिपांग’ची लयदार धून असो, सलील कुलकर्णींचं गाणं थेट आत जाऊन भिडतं. गाण्यांमधलं नाविन्य, त्यातली गुणवत्ता, त्यातली सुश्राव्यता असे अनेक aspects जपत या संगीतकाराचं आपल्याला खिळवून टाकणं चालूच आहे.
’हृदयामधले गाणे’ ऐकल्यावर तर आपल्याला खात्रीच पटते की दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, वसंत देसाई, हृदयनाथ मंगेशकर, प्रभाकर जोग, अशोक पत्की अश्या मराठी संगीतसृष्टीला लाभलेल्या अनेक दिग्गज संगीतकारांची परंपरा - त्यांच्यापेक्षा थोड्याश्या अधिकचं चांगल्या पद्धतीने- पुढे चालवण्याचे कार्य सलील कुलकर्णी करत आहेत. He is one of the greatest musician of our time.....
या अल्बममधील गाणी व त्यांचे थोडेसे विवेचन पुढीलप्रमाणे –
१. रुणझुण रुणझुण नादत पैंजण –
High Tempo मधले पण अतिशय नजाकतीचे असे हे कृष्णगीत आपले लक्ष वेधून घेते ते मध्ये मध्ये वापरलेल्या छोट्या छोट्या melodious तुकड्यांमुळे. Background ला एक दाक्षिणात्य थाट असलेले हे गाणे अंतरा व मुखडा दोन्हीकडे कमालीचे सुंदर आहे. कानाला प्रचंड सुखावह असलेल्या या गीताचा एक ठसा मनावर उमटून जातो.
२. तुझाविना, सखया तुझ्याविना –
’गुरु’ मधल्या ए. आर. रेहमानच्या जादूची आठवण यावी असे हे गीत त्याच्या अनोख्या लयीमुळे एकदम आवडून जाते. बासरीचे पिसेस तर अप्रतिमचं आहेत पण कडव्याची चालही तितकीच soothing आहे.
३. जंतरमंतर रातीने –
Folksong च्या अंगाने रचलेले हे गीत अंगावर एक शहारा आणून जाते. लोकगीतामधला rawness पण त्याला सलील कुलकर्णींच्या संगीतात असतो तसा Softer Melody चा हलकासा तीट लगेच जाणवतो.
४. दूर नभाच्या पल्याड कोणी –
Saleel At His Hormonal Best !!! काय चाल बांधलीय या गीताची !!! केवळ अशक्य !!!
सलील कुलकर्णी या संगीतकाराची ताकद लक्षात यायला हे एक गाणे पुरेसे आहे. ’संधीप्रकाशात’ या अल्बममध्ये असणारा या गाण्याचा पहिला भाग किंवा कार्यक्रमांमधून म्हटल्या जाणार्‍या चालीपेक्षा वेगळी चाल इथे आहे पण ती आत्यंतिक श्रवणीय झालेली आहे. शब्दांना बहारदार वळसे घालत, श्रुतींशी लडिवाळपणा करत सलीलचं हे गाणं पुढं जात राहतं अन् आपल्याला धुंद करत राहतं. गाण्याचा opening piece ऐकताना आपल्याला थेट युरोपिअन symphony ऐकत असल्याचा भास होतो. बेलाने ज्या tremendous गोडीत सूर आळवले आहेत त्याचे वर्णन करायला तर माझ्याकडे शब्दचं नाहीत. अंगावर रोमांच आणणार्‍या एका अद्‍भूत लयीत तिने हे गाणं म्हटलयं. कितीदा जरी ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे हे गीत म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे.
५. निळ्या मनाचे –
संथ, शांत स्वरलाटांवर तितक्याच अलगदपणे तरंगायला लावणारे हे गाणे त्याच्या Subdued Pace मुळे आपल्याला अगदी विश्राम पावायला लावते. तो निळा रंग जणू आपल्याही आजूबाजूला पसरलाय अशी शब्दातीत अनुभूती देऊन हे गाणे अगदी कातर करून सोडते. कृष्णभक्तीचे निगूढ वर्णन असणार्‍या या संदीपच्या भावोत्कट कवितेच्या तितक्याच उच्च दर्जाच्या सादरीकरणातून सलील व बेला आपल्याला एक आगळाचं योगानुभव देऊन जातात.
६. हृदयामधले गाणे माझे –
या गाण्याला एक आंतरीक आवेग आहे. एक बेभान ताल आहे. तो सलीलच्या सळसळणार्‍या composition मधून आपल्या समोर सतत येत राहतो. छानचं जमून आलंयं हे.
७. राती, अर्ध्या राती –
एकदा ऐकले तरी कायमचे लक्षात राहील असे हे गाणे. लोकसंगीतात, ठेका धरावासा वाटणार्‍या समेबरोबर भावविभोर melody चा वापर करणारे सलील कुलकर्णी हे एकमेव संगीतकार मी आजपर्यंत पाहिलेत. याचे धृपद सलीलने ज्या अत्युच्च कलाकुसरीने गुंफलयं ते केवळ थक्क करणारं आहे. Quintessential Saleel with his exquisite delivery once again…. बेलाने तर कमालंचं केलीय. तोंडात बोट घालायला लाबणार्‍या अश्या काही जागा तिने इथे घेतल्या आहेत. काही काळ तर तरी आपल्याला पुर्ण गुरफटून टाकणारं, बाकीचं सगळं सगळं विसरायला लावणारं असं हे प्रचंड सुंदर गीत.

मी ही गाणी अनेक वेळा ऐकली. त्याच्या सूरात अवगाहन करताना भान हरपलं गेलं. दर वेळी नित्यनूतन वाटणारा हा ठेवा प्रत्येक मराठी संगीतप्रेमी रसिकाने संग्रही ठेवावा व पुन्हा पुन्हा जरूर ऐकावा.