Saturday, August 1, 2009

पत्तेशोधन – काही चिंतन

Finding address is like finding a bride. You consume lot of time in it. Till end you are never clear about exact details. People often mislead you and at the end you realize that the one you were looking for all around, was actually very near.
- Vikrant D.
(अशी ओपनिंग लाईन, ती सुद्धा इंग्लिशमध्ये टाकली की वाचकांचे लक्ष एकदम वेधून घेतले जाते. म्हणून आजकाल मी त्या स्वतःच तयार करायला लागलोय. याला म्हणतात सेल्फ-मार्केटींग. आयटीमधले रिसेशन कमी झाले नाही तर पुढेमागे अश्या ओळी लिहून द्यायचा स्टॉल टाकण्याचा विचार आहे :):))

’ए मेरी मंझिल, है कहां?” हे फक्त चित्रपटगीत उरलेलं नसून तो शहरी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पत्ते शोधण्याची मुश्कील वेळ ही प्रत्येकावरच कधी ना कधी येते. (त्यातून तो उपक्रम पुण्यनगरीत करायचा असेल तर मनाची अन् शरीराची एक वेगळीच तयारी आवश्यक असते !!!). कित्येकदा काम ’फत्ते’ व्ह्यायच्या आड हे (न सापडलेले) ’पत्ते’ येतात. अचूक पत्ते कमीत कमी वेळात सापड(व)णं ही पासष्टावी कला म्हणून गणली जावी. पत्ते सापडणे व ध्येयनिष्ठा यांचा खुप घनिष्ट संबंध आहे असे नुकतेच आमच्या लक्षात आलेले आहे. ज्याला ’२१, डुल्या मारूतीमागे’ हा address सापडत नाही तो मनुष्य जीवनातली इतर अनेक उदात्त अन्‍ खडतर ध्येयं कशी काय साध्य करणार? (या तडफदार वाक्याबद्दल...जोरदार टाळ्या...). हे म्हणजे अंगी नेमस्तपणा व व्यावहारीक चातुर्य नसल्याचेचं लक्षण आहे असे एका विचारवंतानी (गल्लीच्या तोंडाशी उभे राहून) व्यक्त केलेले मत आहे. (या स्पर्धात्मक युगात याचाच ’पत्ता’ कट व्ह्यायचा एखाद्या दिवशी :)..हे मात्र माझे मत)
*************************************************************************************
पत्ते विचारण्याच्या प्रक्रियेत दोन distinct agencies सामील असतात. एक पत्ता विचारणारे व दुसरे सांगणारे. (दुरून नुसती मजा बघणारे प्राणी हे passive ingredient पण काही वेळा खुप मज्जा आणतात. एखादा जर चुकीचा पत्ता सांगतो आहे असे चुकून जरी आपल्याला वाटले तरी या त्रयस्थ मंडळींच्या चेहर्‍यावर एक नजर टाकावी.’शब्दावाचून कळले सारे’चा अनुभव येवून जाईल.) पत्ता विचारताना वापरले जाणारे सर्वसाधारण प्रश्न...
अ) ’हे पाटील कुठे राहतात?’ (आता हा इतका generic प्रश्न आहे की असे विचारल्यावर मी ’राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली’ पासून ते ’घरात’ पर्यंत काहीही उत्तर देउ शकतो.)
आ) ’अंजली अपार्टमेंट’ कुठशी आली? (ती बिचारी कुठे येणार? आहे तिथेच आहे.)
इ) ’श्रीकृष्ण मेडिकल’ कुठे भेटेल? (निर्जीव वस्तूंविषयी ’भेटेल’ हे क्रियापद वापरणार्‍या मंडळींचा मला भयंकर राग येतो. उदा. ’बस भेटली का?’,’Xerox पुढच्या दुकानात भेटेल’ इ.इ. काय हे? प्रश्नकर्ते मान्यवर टिळक रोडने चाललेत व ते ’श्रीकृष्ण मेडिकल’ दुकान शास्त्री रोडने येते आहे. दोघांची अलका टॉकिज चौकात कडकडून भेट झाली आहे (आणी त्यामुळे सगळी traffic block झाली आहे) असे हॅरी पॉटर fictionच्या तोंडात मारेल असे कल्पनाचित्र हा प्रश्न ऐकल्यावर माझ्या मनात उभे राहते.)
ई) ’नगरला जायचा रोड हाच का?’ (शंभरपैकी नव्वद वेळा हा प्रश्न नगरच्या बरोबर विरुद्ध दिशेकडे तोंड करून उभ्या केलेल्या गाडीतून ऐकायला मिळतो. आपण बरोबर रस्ता दाखवल्यावरही reverse बसत नाही हे कारण पुढे करून शंभर मीटर सरळ जाउन हाच प्रश्न अजून एकाला विचारला जातो.)
उ) ’पिंपरी कॅंप’ (हा एक मितभाषी पण मोठा confusing प्रकार आहे. आता एवढेच बोलल्यानंतर हा पत्ता विचारतोय का भाडी गोळा करत चाललाय का पुढचं काही सांगण्याची ही प्रस्तावना आहे तेच कळत नाही. पण विचारणार्‍याच्या चेहर्‍यावर कुठलीच विरामचिन्हे किंवा कसल्याच भावना उमटत नसल्याने आपणच guess करत रहायचे)
ऊ) ’हे एसेल कॉलेज कुठे पडतं?’ (मला अजून तरी माहीत नाही की हे कॉलेज असं ठरवून व कुठे जाउन पडतं :D :D ....पडेल तेंव्हा पडेल....तिथे फक्त ’पडेल’ चेहर्‍याने जाउ नका म्हणजे झालं. माझ्या मनचक्षुंसमोर मात्र ’गॉडझिला’ किंवा तत्सम चित्रपटातून Special Effects ने दाखवलेल्या कोसळणार्‍या Buildings येतात :D)
*************************************************************************************
सकाळच्या प्रसन्न समयी मी एक पत्ता शोधत त्याच त्याच परिसरात घुटमळत होतो. शक्य तेवढ्या गोंधळवून टाकणार्‍या पाट्यांमुळे मी जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखा इतस्ततः भटकत होतो. हे सर्व दुरून पहात असलेल्या एका काकांनी हाताने इशारा करून मला बोलावले. “कोण हवंयं आपल्याला?” जवळपास माझ्या अंगावर ओरडत त्यांनी विचारले. “अहो, मी घाणेकरांचं घर शोधतोय.” मी हातातला कागद त्यांना अजीजीने दाखवत म्हणालो. त्याकडे न पाहता मला आपल्या शेजारी बसवून घेत ते म्हणाले, “घाणेकर... हा हा हा... माझा सहकारी होता....मी जेंव्हा मुंबईला नोकरीला होतो तेंव्हा डोंबिवलीला रहायचो आणि फोर्टमध्ये कामाला जायचो. हा घाणेकर विलेपार्लेला रहायचा.” असे म्हणून काकांनी सांगायला सुरुवात केली. त्यांच्या non-stop कथनातून पुढच्या सहा मिनिटात मला कळालेल्या मौलीक गोष्टी खालीलप्रमाणे –
१) काकांचा मुलगा अन् सून अमेरिकेत सॅन होजेला स्थायिक झालेलेल आहेत.
२) ऍलोपथीपेक्षा होमिओपथी चांगली अन्‍ त्याहीपेक्षा आयुर्वेद बरा.
३) काकू शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत.
४) या घाणेकरने काकांना १९८२ साली एक इंपोर्टेड पेन भेट दिले होते.
५) आम्ही जिथे बसलो होतो तिथे पुर्वी शेत होते व तिथून पर्वती अन्‍ कात्रजचा बोगदा एकदम दिसायचे
६) काकांकडे प्रभा अत्रे, कुमार गंधर्व वगैरेंच्या दुर्मिळ ध्वनीफिती आहेत.
७) कोपर्‍यावरच्या वाण्याकडे वस्तू ’बिग बझार’ पेक्षा स्वस्त मिळतात.
८) घाणेकर बोटीने फ्रान्सला जाउन आला.
९) काका ’सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ’, ’सुहास्य हास्यक्लब’ वगैरे आठ ते दहा संघटनांचे सभासद आहेत (व ते ज्या दिवशी उपमा, शिरा, इडली असे मऊ पदार्थ नाष्ट्याला असतात त्याच दिवशी मीटींगला उपस्थित राहतात.)
१०) महानगरपालिकेने कुत्री पकडण्यासाठी नेमलेले लोक काही काम करत नाहीत.
अखेर खोकल्यासाठी त्यांना थांबलेले पाहून मी चित्त्याच्या चपळाईने कागद परत पुढे सरकावत म्हणालो, “पण हे घाणेकर राहतात कुठे?”.
“कोण घाणेकर?” काका माझ्याकडे पहात म्हणाले.
“अहो, त्यांचाच तर मी पत्ता शोधतोय ना इतका वेळ... ते राहतात कुठे?” मी माझ्या प्रकृतीला न साजेसा संयम राखत विचारलं.
“बघू बघू” असे म्हणत काकांनी तो कागद हातात घेतला आणि तितक्याच वेगाने परत माझ्या हातात देत म्हणाले “छ्या... असे कोणी इथे रहात नाहीत. तुम्ही घाणेकर म्हणालात म्हणून मला एकदम आमच्या मित्राची आठवण झाली. ते तिकडे पलीकडच्या सोसायटीत विचारा.” असे म्हणून काका परत एकदा फिरायला येणार्‍या सुंदर्‍यांचे बारकाईने निरीक्षण करू लागले. संतापातिरेकाने मी मात्र वेडापिसा होऊन गेलो. अखेर ’यांच्या घरासमोर पाणीपुरवठा विभागाने मोठा खड्डा खणून यांची लाईन तोडून टाकावी’, ’यांच्या घरी टाकलेल्या ’सकाळ’ पेपरची मधली ८ पाने गायब असावीत’, ’यांची पेन्शन सहाव्या वेतन आयोगावरून डायरेक्ट दुसर्‍या आयोगावर यावी’, ’यांच्या घरात कोणतेही चॅनेल लावले तरी त्यावर ’राखीका स्वयंवर’च दिसावे’ असे विविध शाप (मनोमन) देउन मी तेथून निघालो.
*************************************************************************************
थोडे पत्ते सांगणार्‍यांविषयी. यात तीन प्रकार संभवतात. एक अचूक पत्ता माहित असणारे. दोन Place in questionची जुजबी माहिती असणारे व तीन विचारल्या गेलेल्या पत्त्याबद्दल ठार अनभिज्ञ. आता माणसांच्या अंगभूत कलागुणांनुसार या तीन प्रमुख वर्गांमध्ये अनेक permutations & combinations दिसून येतात. पत्ता माहित असणारे पण व्यवस्थित explain करू न शकणारे, माहित नसणारे व अत्यंत माणूसघाणे (कधी कधी अश्या मंडळींच्या आधी त्यांची पाळीव श्वापदे अंगावर येउन ’पत्ता नको पण कुत्रा आवर’ अशी अवस्था करून टाकतात :-)). यातली सगळ्यात dangerous जमात म्हणजे अर्धवट माहीती असताना वेळ घालवण्यासाठी (व समाजसेवेच्या उत्साहात) पत्ता सांगण्याच्या नावाखाली दिशाभूल करणारे. ह्यांचा प्रादुर्भाव हा रिकामी बाकडी, न चालणारी दुकाने, कट्टे, सार्वजनिक वाचनालये (दीड-दीड रुपयाला मिळणारे सहा पेपर जिथे ठेवलेले असतात त्या 2 X 2.5 फुटाच्या जागेला ’वाचनालय’ म्हणणे हे फक्त पुण्यातच घडू शकते. याच नियमाने इथे कमरेइतक्या उंचीच्या शेवाळ लागलेल्या रांजणाला ’पाणपोई’ म्हटले जाते. असो.), झाडांचे पार, पुलांचे कठडे या अश्या अनेक ठिकाणी होत असतो. बरेचदा आपण कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय हेही माहित नसलेले असे इसम ’कासट केमिकल ना? हे काय इथेच तर आहे. जरा अस्सं जायच...’ वगैरे चुकीच्या directions अत्यंत confidently देतात. त्याप्रमाणे आपण केलेचं तर आपली अवस्था ’ढूंढता फिर रहा, धूपमे रात दिन, मैं यहांसे वहां’ अशी झाल्याखेरीज रहात नाही.
*************************************************************************************
पेठांमधले पत्ते शोधणे हा एक खुप मोठा मनोरंजनाचा प्रकार असतो. त्यासाठी आपल्याकडे भरपूर मोकळा वेळ व स्थितप्रज्ञता असणे जरूरीचे आहे. ’नारायण ४०’ ’नारायण ४१’ नारायण ४२’ नंतर एकदम ’नारायण १७३’ किंवा ’शनिवार ५२’ असा कोणताही क्रमांक येवू शकतो. शाळेतल्या पाढ्यांप्रमाणे घराचा नंबरवरून पत्ते शोधणारा इसम एक तर बाहेरचा असावा वा या कृतीसाठी नवखा असावा. ’खजिना विहिरीजवळ’ या एवढ्याश्या पत्त्यावर ठिकाण हुडकून काढता काढता मेटाकुटीला आलेला जीव (त्याच) विहिरीत द्यावा असा हताश विचार अनेकांच्या मनात येत असणार. ’कसबा गणपतीसमोर’ या पत्त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसून ’समोर’ म्हणजे ती वास्तु ’कसबा गणपतीच्या’ दाही दिशांना कुठेही असू शकते. या बाबतीत लौकिक भुगोल पुण्याला applicable नाही.
*************************************************************************************
स्थळ – रामबाग कॉलनी
वेळ – कुणावरही येवू नये अशी
मी गेले अर्धा तास एका व्यक्तीचे घर शोधत होतो. जवळपास प्रत्येक सोसायटीत त्याने दिलेल्या बंगल्याचे शोधून पाहिले होते. महाशयांचा फोनही लागत नव्ह्ता. केविलवाण्या चेहर्‍याने मी अखेरचा प्रयत्न म्हणून कोपर्‍यावर उभ्या असलेल्या रिक्षास्टॅंडकडे वळालो. तिथे साधारण चार-पाच जण रिक्षापासून शक्य तेवढे लांब (प्रवाश्यांना दिसू नये अश्या बेताने) आराम करत बसले होते. तिघा जणांची डोकी ’लोकमत’ मध्ये खुपसलेली. (सर्व रिक्षावाले फक्त ’लोकमत’ किंवा ’पुढारी’च का वाचतात हा प्रश्न मला ’समुद्राला पौर्णिमेला भरती का येते?’, ’गांगुली व दालमियामध्ये नेमके कश्यावरून फाटले?’ किंवा ’कतरिनाने सलमानमध्ये असे नेमके काय पाहिले?’ या अनुत्तरीत प्रश्नांसारखा सतावत असतो.) मी तिथे रिक्षात बसण्यासाठी आलेलो नसून चौकशी करायला आल्याचं कळाल्यावर त्यांच्यात अचानक उत्साह संचारला. (भाडे आल्यावरंचं यांच्या अंगावर काटा का येतो काही कळत नाही.) दोघे जण पुढे येवून परस्परांच्या एकदम विरुद्ध दिशा सांगू लागले. पेपर आणि रम्मीचा रंगलेला डाव बाजूला ठेवला गेला. त्यांच्यातला एक जरा नविनचं दिसणारा तरुण मोठ्या धाडसाने मला म्हणाला, ’बसा ना गाडीत, आपण शोधून काढू”. सिनीयर चालकांनी त्याचाकडे अतिशय जळजळीत कटाक्ष टाकत त्याचा आवाज दाबून टाकला. (बहुधा मी तिथून गेल्यावर त्याची ’जवळची भाडी स्वीकारणे’ या घोर गुन्ह्यासाठी चांगलीच खरडपट्टी झाली असावी. त्याबद्दल त्याला ’सिग्नल पाळणे’,’वळताना इंडिकेटर दाखवणे’,’दरपत्रकाप्रमाणे पैसे आकारणे’ इत्यादि कठोर शिक्षा ठोठावल्या गेल्या असाव्यात. :P :P). त्यांच्या छोट्याश्या वादविवादाच्या अंती मी पश्चिम दिशेस जावून तिथल्या ’कुठल्याही’ दुकानदारास विचारावे असे ठरले. मला योग्य(?) तो सल्ला दिल्याच्या आनंदात सर्व चालक-मालक (आलेल्या दोन-तीन ग्राहकांकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करून....म्हणजेच भाडी नाकारत) चहा प्यायला बाजूच्या टपरीवर निघून गेले.
*************************************************************************************
पत्ते सांगणारे काही विचित्र बहाद्दर आपल्याला भेटतात. असाच एकदा मी लोकमान्यनगरमधे एक फ्लॅट शोधत होतो. बाजून जाणार्‍या एकाला थांबवून विचारले तर तो म्हणाला, “इथून डावीकडे वळा. गुलमोहोराच्या झाडापासली दुसरी बिल्डींग. तळमजल्यावर तुम्हाला तिरडी, मडके, फुले वगैरे मयतीचे साहित्य दिसेल. आतून खुप मोठ्यांदा रडण्याचे आवाज येतील. गर्दी जमलेली दिसेल. बस्सं.....(एक pause) त्याच्या बरोबर वरचा फ्लॅट.” क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकवून गेला होता तो. हा इसम नक्कीच सगळे पुणे पहिल्या जलधारांचा आनंद लुटत असताना ’कोसी’ नदीला बिहारमध्ये आलेल्या मागच्या वर्षीच्या पुराच्या बातम्या वाचत बसत असणार आणी साधे कुणाचे हात-पाय-अंग दुखत असेल तर त्याला स्वाईन फ्लु साठी hospital मध्ये admit करायला लावत असणार :P :P
*************************************************************************************
मला न्यायला येणारी आमच्या office ची cab हा एक वेगळयाच लेखाचा विषय. पण रोज पत्ता शोधून काढताना जो अभूतपुर्व गोंधळ ते गाडीवाले घालतात त्याने दिवसाची सुरुवात कशी eventful होऊन जाते.
आंघोळ करून, शुचिर्भूत होऊन, देवाची स्तोत्रे म्हणत किंवा मुग्धाची गाणी गुणगुणत मी बाहेर आलेलो आहे. तेवढ्यात सेलफोन वाजतो. हा आमच्या ड्रायव्हरने दिलेला पहिला missed call. मी धीर धरून त्याला फोन लावतो. Johny Lever च्या आवाजातील विनोदी dialogueपासून ते भीमसेन जोशींच्या अभंगांपर्यंत Hello-Tune असलेला आमचा कंपनीचा कॅबवाला फोन उचलतो. त्याच्या आजूबाजूला असलेल्या गाड्य़ांइतकीच वाहने माझ्या घराच्या आतल्या बाजूला आहेत अश्या समजूतीने तो कमाल डेसिबलच्या पातळीत बोलायला लागतो. मी फोन speakerवर टाकतो.
ड्रा.: हाँ साब, पिकअप है ना आपका?
मी: (शुद्ध मराठीत) हो. आहे.
ड्रा: किधर आनेका है? (इथे त्याच्या शेजारून कर्णकर्कश horn वाजवत एक pulsarवाला pass होतो.)
मी: तुम्ही कुठे आहात?
ड्रा: गाडीमध्येच.
(इथे मी इतक्या सकाळी हा विनोद सहन न होऊन बूट जोरात आदळतो.)
मी: अहो पण गाडी कुठे आहे?
ड्रा: ह्ये काय इथं गणपती मंदिरापाशी उभी हाय.
मी: अहो, पण इथे अनेक गणपती मंदिरे आहेत. नेमके कुठे? आणी माझा पत्ता दिलाय ना पिकअप शीटवर?
ड्रा: साहेब, आपल्याला इंग्लिश नाय ना वाचता येत.
(मी हा धक्का पाण्याच्या घोटाबरोबर गिळून टाकतो.)
मी: तुमच्या आजूबाजूला कोणी असेल ना? त्याला विचारा.
ड्रा: इथं कुनीच नाय. फगस्त शाळेच्या दोन मुली उभ्या हायेत. विचरू का त्येनला?
(आता या घोड्याला येत नसलेले इंग्लिश लहान मुलींना काय येणार?)
मी: नको, नको. तुमच्या आजूबाजूला काय दिसतेय सांगा.
ड्रा: एक रोड हाय. दोन बिल्डींग हायीती. एक मोठे झाड हाय.
(महाराष्ट्राच्या कुठल्याही गावातल्या कोणत्याही भागाला लागू पडणारे हे वर्णन ऐकून माझे डोके फिरू लागते. Speaker चालू असल्याने घरच्यांचे व बिल्डिंगमधल्यांचे फुकटात मनोरंजन होत असते.)
मी: काहीतरी मोठी खुण सांगा ना. काही दुकान वगैरे आहे का?
ड्रा: हो हाय की. एक किराणा दुकान हाय इतं. त्ये नाय का नारळ बाहेर ठेवल्यात. दुधाच्या पिशव्या ठेवल्यात आणी वर रानी मुखर्जीचा फोटू हाय कॅडबरी खातानाचा....
(आता रानी मुखर्जी व कॅडबरी हे combination मला काही कळाले नाही. तो एका वेगळ्याच लेखाचा विषय आहे. असो.)
मी: अरे माझ्या राजा, त्या राणीच्या पायथ्याशी कोणी माणूस नाहिये का?
ड्रा: हाय वाटतं... (Background ला कुणाच्या तरी गाडीचा irritate करणारा reverse horn)
मी: (माझ्या फोनचे बिल वाढतेय हे पाहून वैतागत) अरे मग विचार ना त्याला.
(ड्रायव्हर फोन चालू ठेवून काहीतरी विचारतो. त्याने फोन विचित्र पद्धतीने धरल्याने मला मुसळधार पाउस, वादळी वारा, TV वरची खरखर असे अनेक आवाज एकसाथ येतात.)
ड्रा: साहेब, त्यो म्हनतोय की पुन्यात नविन हाय.
मी: (मी डोके बडवून घेत) अरे त्या दुकानदाराला विचार रे.
ड्रा: दुकानदार नाहिये. एक पोर्‍या आन एक बाई आहे. त्येनला माह्यीत अस्येल का?
मी: आता तु विचारलंसं तर कळेल ना? एक काम कर, फोन त्या बाईला दे.
(आता फोन बाईकडे आहे. ही दुकानदारीण छोटा शकीलचा खंडणीसाठी फोन आल्यावर मुंबईतले बिल्डर जसे घाबरतात तशी प्रचंड भ्यायलेली. या आमच्या नमुन्याने तिला काय सांगून फोन दिलाय काय माहीत?)
दु: हाँ ...हॅलो...
मी: नमश्कार भाभीजी.... ये आपका दुकान कहांपे है?(गिरता है हे शब्द वापरायचा मोह मी टाळतो)
दु: आं...आं.... सेठ अभी नहीं है...माल लाने गये है...
मी: वोह ठीक है. मैं खाली आपको पता पुछ रहा हूं.. वो हमारी कंपनीकी गाडी आयी है ना उसको मेरा घर नहीं मिल रहा है. (बाजीप्रभूच्या शर्थीने मी हिंदीची खिंड लढवत असतो J)
दु: सेठ आयेंगे ना थोडी देरमे...
मी: आंटी मुझे बस इतना बता दो की ये आपका दुकान कौनसे एरिया में है? कोथरुड, कर्वेनगर या वारजे?
दु: ये बस स्टॉपके बाजूमेही है. वो स्टेशनका बस आता है ना?
मी: (हताश होऊन) जरा फोन उसको देना और आपके सेठ आनेके बाद अपनेही दुकानका पता उनसे जरा पुछ लेना. कभी खो गयी तो काम आयेगा. (सौम्य शव्दात मी घेतलेला हा साहित्यीक बदला !!)
ड्रा: सायेब, काय करू?
मी: मित्रा, तुला डेक्कनच्या पुढचे काय माहीत आहे? आणी एखादी मोठी खुण सांग. तुला माहीत असलेल्या पानाच्या टपर्‍या, हवा भरण्याची ठिकाणं आणी खोदलेले रस्ते मला माहीत असतीलचं असं नाही.
ड्रा: हां मला कोथरूड माहित्याय.
मी: मग एक काम कर. तिथे जा व मला कॉल कर.
(अश्या तर्‍हेने सकाळी सकाळी माझाच पत्ता शोधण्यासाठी मी मोबाईलवर महागडा कॉल करून दिवसाची निराशाजनक सुरूवात करतो. गाडीत एखादा GPS बसवावा असा अत्याधुनिक विचार तरळून जातो. पण तो मी सरकारी कर्मचारी एजंटविना आलेल्या सामान्य माणसाला झटकून देतात त्या तत्परतेने काढून टाकतो.)
*************************************************************************************
खरे तर आपण सारे जीवनपटलावरचे केवळ प्रवासी. मुक्कामी पोहोचायच्या वेळा वेगळ्या आणि मुक्कामाची ठिकाणंही वेगळी. ’जाईन विचारत रानफुला’ असं आजूबाजूच्या पार्थिव-अपार्थिव विश्वाला पत्ता विचारत विचारतचं आपण चालत रहायचं. मिळालेली दिशा योग्य आहे की नाही याची खात्री करत रहायची अन्‍ हा प्रवास एक दिवस आपापल्या ठरवलेल्या Destination Point ला ’सुफळ संपुर्ण’ करायचा…………….
निळोबारायांनी म्ह्टलंयं ना,
“मार्ग दाखवून गेले,
दयानिधी संत ते,
वाटे त्यांच्या चालू जाता
न पडे गुंता सकळ काही”.

बस्सं.......अजून काय हवं???
*************************************************************************************
टीप - लेखाचा शेवट serious केल्याने आधीची सर्व पापे धुतली जातात व आपला समावेश अष्ट्पैलू विचारवंत साहित्यिकांमध्ये होतो असे मी एका सरकारी समितीवर वर्णी लागलेल्या (पण उठसूठ बौद्धीके देणार्‍या) माननीयांकडून एकले होते. म्हणून हा anti-climax !!!!!!!!!!
*************************************************************************************