Wednesday, July 15, 2009

विडंबन- 'नसतेस घरी तू जेंव्हा'

मूळ गीत – नसतेस घरी तू जेंव्हा

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो ॥धृ॥
नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन्‍ चंद्र पोरका होतो ॥१॥
येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो ॥२॥
तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा,
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो ॥३॥
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा,
समईंचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो ॥४॥
ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजूनी झालो,
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो ॥५॥
(कवि – संदिप खरे
संगीतकार आणि गायक – डॉ. सलील कुलकर्णी)


विडंबन- (संदीप, सलील आणि बेंचवरच्या प्रजेची क्षमा मागून :P :P)
पार्श्वभूमी – (आठवा ते आपले आय.टी.मधले सुरुवातीचे दिवस. प्रोजेक्ट्ची क्लॅरीटी नव्हती. काही विशेष काम नव्हते. या वेळी बेंचवर असताना खुप निष्ठेने करायचा एक कार्यक्रम म्हणजे चॅटींग. आपल्यासारखीच बेंचवर असणारी ती पलीकडच्या क्युबीकलमधली सुंदर मुलगी दिवसभर आपल्याशी गुलुगुलु बोलत असायची ऑनलाईन. तिच्याशी गप्प मारता मारता दिवस कसा संपायचा हे कळायचे नाही. पण “All Good Things Come to End” त्याप्रमाणे एक दिवस ती एका प्रोजेक्टवर बिलेबल् झाली. आता ती क्लायंट VPN वापरू लागली. आता तिचं ते ऑनलाईन दिसणं नाही की ते आपल्याला सारखं ping करणं नाही. अश्या उदास, विमनस्क मनस्थितीत म्हटलेलं हे गाणं......)

नसतेस ऑनलाईन जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जीटॉकचे विरती धागे
ऑरकूट फाटका होतो ॥धृ॥
डिस्क फाटून क्रॅशच व्हावी
कल्लोळ तसा ओढवतो,
चॅटींग दिशाहीन होते
अन्‍ लॅन पोरका होतो ॥१॥
येतात मेल दाराशी
हिरमुसून जाती मागे,
विंडोशी थबकून कर्सर
तव मेसेजवाचून जातो ॥२॥
लघुलिपीत खेळवणार्‍या
त्या स्माईली स्मरती सगळ्या,
प्रॉक्सिविन नेट अडावे
मी तसाच अगतिक होतो ॥३॥
तू सांग सखे मज काय
मी सांगू या स्टेटसलाईनना,
माउसचा जीव उदास
माझ्यासह क्लिकक्लिक करतो ॥४॥
ना अजून झालो अलोकेट
ना बिलेबल अजूनी झालो,
तुजवाचून पिंगींग राहते
तुजवाचून मेसेंजर अडतो ॥५॥