Thursday, July 2, 2009

पुण्याचा पाउस आणि मान्यवर

विशेष टीप – खाली नमूद केलेली पात्रं (:P) व प्रसंग हे संपुर्ण काल्पनिक आहेत. त्यांचं कुठल्याही जीवंत व्यक्ती किंवा घटनांशी साधर्म्य आढळल्यास तो भारतासारख्या खंडप्राय देशाच्या संपन्न साहित्यभांडारात घडणारा छोटासा योगायोग समजावा. (जोरदार टाळया होऊन जाउ देत माझ्यासाठी एकदा....माझी मराठी सुधारल्याचा अजून काय पुरावा हवा आहे?)

पुण्यामधील पावसाने मारलेली दडी आणि त्यामुळे उद्‍भवलेली भीषण स्थिती आता सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेली आहे. परिस्थिती इतकी वाईट बनली आहे की लोकांना एकमेकांना पाण्यात बघायलाही पाणी शिल्लक नाहिये.
खरेतर पुणे आणि पाणीटंचाई हे दोन शब्द गोलंदाज ’करभजन’ व शिस्त किंवा साहित्य महामंडळाचे सर्वेसर्वा ’भौतिकराव आले-पाटील’ व नम्रपणा या जोड्यांइतके विसंगत वाटतात.
पण या वर्षी सगळेच आक्रीत. भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी या वरूणराजाने पळवले आहे. एवढेच काय तर भीती किंवा काळजीने नागरिकांच्या काळजाचे पाणी पाणी होणेही बंद झाले आहे. (’दर्जेदार विनोदाची निर्मिती ही नेहमी करूणेतूनच होत असते’ – इति चार्ली चॅप्लिन. ’प्रस्तुत लेखकामध्ये करूण पार्श्वभूमीवर विनोद फुलवण्याची विलक्षण हातोटी आहे.’ – इति दुसरे कोण? मी स्वतःच !! इथे जरी मी माझी पाठ सार्वजनिक जागी स्वतःच थोपटून घेतलेली असली तरी मी ’उपदेशकर’ घराण्याशी दुरान्वयेही संबंधित नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. :P)
अश्या उद्वेगजनक काळातही प्रसारमाध्यमे अत्यंत इमानेइतबारे आपापल्या स्वभावधर्माला अनुसरून बातम्या कव्हर करत आहेत. कोणतीही गोष्ट घडो की मान्यवरांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या अशी शपथ घेतलेल्या वाहिन्या आता पुढे सरसावलेल्या आहेत.
मायमराठीपैकी अशीच एक (स्वयंघोषित) लोकप्रिय वाहिनी म्हणजे ’काय-बी-येन ठोकमत’. याचे तुफान विनोदी संपादक श्री ’मिश्किल कागळे’ हे पुण्याच्या पावसावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया घ्यायला बाहेर पडले. इतर वेळी आपल्या चॅनेलवर लोकांना बोलावून त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न अत्यंत मार्मिक पद्धतीने विचारणे (आणि शक्य तिथे त्यांची आपापसात भांडणे लावून देणे) या महत्वाच्या गुणाबरोबरच त्यांची अत्यंत मजेशीर अशी भाषा लोकांमध्ये हीट झाली म्हणे. त्यामुळेच की काय लोक माहितीपेक्षा मनोरंजनासाठी त्यांचे कार्यक्रम बघत असतात. (अर्थात ’ओबामाने मारी मक्खी’,’लडकीके छातीसे निकलेगा साप’ किंवा ’कमिशनरके कुत्तेको सर्दी’ आणि ’सेहवाग के शादीका घोड़ा’ वगैरे हिंदी चॅनेलवरच्या बातम्या पाहण्यापेक्षा मराठीतला विरंगुळा केंव्हाही चांगला असा स्तुत्य हेतु असावा सामान्य लोकांचा :D :D)
कागळेंना वाटले सर्वप्रथम आपण पुण्यातील मान्यवरांनाच पकडूयात.
**********************************************************************************
पुण्याचे लाडके आणि विश्वप्रसिद्ध कवी ’मंदीप बरे’ यांना कागळेंनी या विषयी विचारले.
त्यांनी सुरुवात केली.
“माझ्या ’पियुषावर बोलू काही’ या अतिगाजलेल्या – ज्याचा नुकताच पाचशेवा प्रयोग पार पडला – कवितेच्या कार्यक्रमात मी पावसावरच्या बर्‍याच कविता सादर करत असतो. माझ्या प्रत्येक रचनेला टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा पाउस पडत असतो......”
कागळेंनी अस्वस्थ होऊन कविवर्यांना मूळ विषयाची आठवण करून दिली. त्यावर ’बरे’ म्हणाले ”माझे संपुर्ण जीवन म्हणजे फ़क्त कविता. तेंव्हा मी माझी प्रतिक्रिया (माझ्याच) एका कवितेतून देतो.
काय रे देवा,
आता पुन्हा पाणीकपात होणार,
मग ती रिकामी भांडी कुणाला दाखवता नाही येणार,
मग तोंडातून थुंकायला आणि डोळ्यातून रडायला पाणी शिल्लक नसणार,
मग नशिब माझी बिन’पाण्यानं’ हजामत करणार,
मग ’पाणचट’ हा शब्द लोकांच्या शब्दकोशातून हद्दपार होणार,
काय रे देवा........”
सवयीप्रमाणे पहिल्या कडव्यापाशी Once More च्या प्रतिक्षेत त्यांना थांबलेलं पाहून कागळेंनी हजाराव्या प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या आणि आपला गाशा गुंडाळला.
**********************************************************************************
पुण्यात जगप्रसिद्ध लोकांना काहीच तोटा नाही. विख्यात मुलाखतकार श्री.’अधीर बाडगीळ’ यांना गाठून कागळेंनी त्यांना विचारले. त्यावर (समोर माईक असल्याच्या आविर्भावात) त्यांनी सुरुवात केली.
“मी अनेकांच्या मुलाखती घेतल्या. या शिंच्या पावसाची घेण्याचं राहूनच गेलं. पण कधी संधी मिळाली तर मी त्याला विचारणार आहे की बाबा रे असा बेभरवशेपणाचा आळ लोक तुझ्यावर घेतात तेंव्हा काय वाटतं? तुझ्या नेमक्या भावना काय असतात?” गाडगीळ मनोमन मुलाखतीचं चित्र रंगवत पुढचे प्रश्न तयार करू लागलेले पाहून कागळेंनी तिथून पळ काढला.
**********************************************************************************
महाराष्ट्राचे आजचे आघाडीचे, लोकप्रिय आणि गुणी संगीतकार डॉ.’खलील सोलकर्णी’ – “हा पाउस म्हणजे एक गंमतच आहे. कधी येतो कधी नाही. या पावसाच्या पार्श्वसंगीतावर आधारीत एक चाल मी बांधली आहे. ती माझ्या ’अंधुकप्रकाशात’ या नविन कार्यक्रमात घेणार आहे.
बाकी पुण्याचा पाउस म्हणजे भारतीय क्रिकेट संघासारखा आहे. अत्यंत अन‍प्रेडिक्टेबल.”
क्रिकेट आणि संगीत या दोन्ही विषयात असलेला आपला अपुरा व्यासंग लक्षात घेउन कागळेंनी तिथून हळूच काढता पाय घेतला.
**********************************************************************************
पावसाच्या समस्येबद्दल विचारण्यासाठी कागळेंनी जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, महाराष्ट्रभूषण ’नामचीन चेंडूलकर’ याला गाठले. त्याने सर्वप्रथम हा कार्यक्रम कोणत्या शीतपेय, बूट अथवा वाहन उद्योगाने प्रायोजित केलेला आहे का याची चाचपणी केली. यातून आपल्याला काहिही पैसे मिळणार नाहीत असे लक्षात आल्यावर अत्यंत निराश होऊन (आपल्या स्वर्गिय साहित्यिक पित्याच्या मनाला क्लेश होतील अश्या वाईट मराठीत) बोलायला सुरुवात केली.
“ही कॅलॅमिटी खुप सीरियस आहे. रेन सिच्युएशन इस टू बॅड. या प्रॉब्लेम ला एनकाउंटर करण्यासाठी ऑथोरिटीज बरोबर स्टेप घेतील असं मला वाटतं. वॉटर क्रायसेस मध्ये सफर झालेल्यांसाठी मी हा माझा (जुना, मळकट) टी-शर्ट देतो. बी.सी.सी.आय ने याचे ऑक्शन करावे आणि कलेक्ट झालेला फंड (माझ्या नावाने) डोनेट करावा.”
’नामचीन’ ला लगेचच एका जाहिरातीच्या शूटींगला व त्यानंतर त्याच्या नव्या गाडीचा टॅक्स माफ करून घेण्यासाठी मंत्रालयात जायचे असल्याने तो पसार झाला.
**********************************************************************************
कवि प्रेस यांच्या निवासस्थानी जाण्याची घोडचूक मिश्किल कागळेंनी केली. अत्यंत अंधार्‍या वातावरणात ’प्रेस’ हे (आपली पांढरी दाढी खाजवत) गूढ चेहर्‍याने दरवाज्याकडे पहात होते. प्रतिक्रिया विचारताच खुप घाबरवून टाकणार्‍या आवाजात ते बोलू लागले.
“पाउस म्हणजे धरतीचा स्वेद आणी चीरशोषणाची भळभळती जखम.
माझ्या ’काळडोहाच्या छातीखाली’ या नव्या ललितकाव्यसंग्रहात मी लिहिलयं –
प्राक्तनाच्या शैव पारव्यांनो, परत गरदळा अवकाळी, जसा उर्मिलेचा कूट अवबंध, पावसाचे डोळे रक्तवर्ण.”
प्रेस यांच्या नेहमीच्याच शैलीतील अतिशय दुर्बोध ओळी आणि त्यांची ती प्रत्येक काव्यात डोकावणारी उर्मिला (मार्तोंडकरांची नव्हे ;-)), त्या भयानक उपमा ऐकून कागळेंना मळमळू लागले. चक्कर येवून पडायच्या आत त्यांनी ओ.बी. व्हॅनकडे धूम ठोकली.
**********************************************************************************
आजकालच्या काळातले थोर, विनोदी लेखक (आणि टवाळकी व आचरटपाणात आमचे सर्वोच्च आदर्श, अगदी रोल मॉडेल, परम दैवत) श्री.’खिरीश वणेकर’ यांना याबाबत (ते नेहमीप्रमाणे शॉर्टमध्ये हिंडत असताना) विचारले असता ते प्रथम गडगडाटी हसले. नंतर ओरडून म्हणाले (यामुळेच मराठी लाऊड विनोद रूढ होत चाललाय अशी त्यांची भाबडी समजून आहे.), “पुण्याच्या पावसाचा व माझ्यासारख्या मुंबईकराचा काय संबंध? हे म्हणजे मोनिका लेवेन्स्कीविषयी आशा काळेंना विचारावे किंवा युरोपातल्या वाईन प्रक्रियेविषयी सांगलीतल्या पुजार्‍याला विचारावे किंवा छोटा शकीलच्या खंडणीच्या पद्धतीविषयी केरळातल्या भरतनाट्यमच्या विद्यार्थ्याला विचारण्यासारखं आहे.”
म्हणजे थोडक्यात आपला कसा त्याच्याशी काडीचाही संबंध नाही हे सांगण्यासाठी ते अशी टोकाची उदाहरणे देउन विनोदनिर्मितीचा अविरत प्रयत्न करीत होते.
कागळेंनी (येता येत नसतानाही, निकराच्या प्रयत्नाने) गंभीर भाव आणून परत विचारले, तेंव्हा समाजवादी नेत्यासारखा मोठा निर्विकार चेहरा करत कापर्‍या आवाजात ते बोलू लागले, “आपल्या आयुष्यात पाउस अनेक रुपांनी येत असतो. त्याचा सगळ्यात जवळचा आविष्कार म्हणजे आपल्या डोळ्यातून आपसूक वहायला लागणार्‍या जलधारा. वय कुरतडायला लागतं. पैलसंध्येचे अंधुक किनारे दिसायला लागतात. असं सर्वांनाच होतं का या पावसाळी हवेत?”
कागळे (त्यांच्या बातम्यांमध्ये ब्रेकमधून आल्यावर जसे गोंधळून जातात तसे) जरासे बावचळून गेले. विनोदी लेखकाच्या तोंडून हे काय असा प्रश्न त्यांना पडला असताना ’असे विषम रस ही त्यांच्या ’माझी फ़ुक्कमबाजी’ या नविन कार्यक्रमाची थीम आहे’ असे बाजूच्या एकाने सांगितलं.
ते ऐकून (श्रोत्यांविषयी) प्रचंड सहानुभूती दाटून आल्याने कागळे वणेकरांना त्यांच्या प्रयोगासाठी (आणि चार महिन्याच्या प्रायोजित अमेरिका दौर्‍यासाठी) शुभेच्छा देउन निघाले.
**********************************************************************************
’शी’ टी.व्ही. ज्या कार्यक्रमाची ’अफ़ाट लोकप्रिय’ वगैरे जाहिरात करत असते त्या ’फायडिया मा रे म न’ च्या सेटवर जाउन मान्यवरांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात असा (आत्मघातकी) विचार कागळेंनी केला.
ते पोहोचले तेंव्हा नेहमीप्रमाणे (एका फ़ीक्स केलेल्या) एपिसोडचे शूटींग चालू होते. पंडितजींना गाठून विचारले असता त्यांनी डोळे अर्धे मिटत, उघडत ’किराणा घराण्याच्या रागातील आरोह-अवरोह’ ’शाहीर येनाजी बाळा यांची यमके’ ’१९५२ सालची मुंबईतील परिवहन व्यवस्था’ ’झपतालातील मात्रा’ ’अमृतानुभवातील उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे’ इत्यादि अत्यंत असंबद्ध विषयांवर वायफळ चर्चा करायला सुरुवात केली. आता यांना वेळीच जर थांबवले नाही तर पुढे पुढे हे ’सांडपाण्याच्या पाईपची दुरुस्ती’ (आम्ही कशी केली) किंवा ’बेंसिन पेरॉक्साईड्चे रासायनिक गुणधर्म’ यासारख्या विषयांवरही काही बोलतील या भीतीने कागळेंनी दोन-तीन (धष्टपुष्ट) प्रेक्षकांच्या मदतीने मोठ्या मुश्किलीने त्यांना आवरलं. पण लाईट आणि कॅमेरा सुरू होताच पंडितजी पुन्हा सुरू झाले.
पंडित घणाघातजी उपदेशकर (उर्फ़ नानासाहेब उर्फ़ वाळासाहेब) -
“या पावसाची एक गंमतीशीर आठवण आहे. ती मी आपल्याला जरा सविस्तरपणे सांगतो. १९५५ साली माझे मित्र कविवर्य ’मारती प्रभु’ यांच्या एका कवितेला मी चाल लावली होती. ते गीत आपल्या ’स्वतादिदी’ गाणार होत्या. पण तो पावसाचा परिणाम काही साधला जाईना. मी जरा वेगळी बंदिश बनवली होती आणि ती मला इथे वापरायची होती. आता तुम्हाला माहीत आहेच की दिदी फार क्वचित रीटेक घ्यायच्या. मला तो पावसाचा भाव कसाही करून आणायचा होता. तिथे दुसर्‍या कवयित्री ’कांताबाई भेळके’ बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, नानासाहेब मी एक सुचवू का? आपल्याकडे एक जुना शॉवर पडला आहे. तो मागे चालू राहू द्या. (महाराष्ट्रात अगदी सुरुवातीला शॉवर वापरण्याचं भाग्य कुणाला लाभलं असेल तर ते ’उपदेशकर’ कुटुंबियांना...... इती बुरेशजी फाडकर, कानाला हात लावत :P:P) मी म्हणालो, ठीक आहे. आणि मग आम्ही ते पुर्ण गाणं मागे शॉवर चालू ठेवून रेकॉर्ड केलं व ते पावसाचं गाणं म्हणून पुढे खुप गाजलं.”
असं म्हणून पंडितजींनी आपण विलक्षण गम्मतशीर काही सांगितलयं अश्या आविर्भावात सर्वांकडे पाहिलं. स्पर्धकांनी मार्कांसाठी उगाच आनंद झाल्याचं दाखवत टाळ्या वाजवल्या. प्रेक्षक आणि वाद्यवृंदाने ’सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अश्या केविलवाण्या अवस्थेत तसाच प्रतिसाद दिला.
बुरेश फाडकर – ये जो (pause) बारिश है (pause) ना बडी नटखट होती है (pause) पण या वर्षी इतका पातळ का आहे (pause) काही (pause) अंअं (pause) कळत नाही (pause) पाण्याचा मजा आला नाही यंदा (pause) एखाद्याच्या गळ्यात असतो ना तसा बारीsssssक गंधार (pause) मान्सूनमध्ये दिखनाही चाहिये बादलमे (pause) पण तुम्हाला जर स्वरांचा मल्हार किंवा मिया-मल्हार ऐकायचा असेल (pause) तर तो भारतात एकच गायिका गावू शकते (यांची पुढची ‘उपदेशकर’पुराणातली वाक्ये एव्हाना प्रेक्षकांनाही पाठ झालेली असल्याने कागळेंनी शूटींग आवरतं घेतलं)
फुल्लवी हौशी – “माझा अगदी आवडता प्रश्न विचारलात तुम्ही.....एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत संपादक मिश्किल कागळे व त्यांच्या सहकार्‍यांसाठी.....काही गोष्टी अश्या असतात की त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे.... (संवादलेखकाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही ओळ विसरली....आता काय, चेहरा फ़ाकून हसा)....आणि योगायोगाची गोष्ट अशी की मागच्या वर्षी याच तारखेला आमचं पर्व चालू असताना धुंवाधार पाउस झाला होता. तेंव्हा in that memory एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत....” कागळेंना वाटले, बाई ICUत कुणाला भेटायला गेल्यावर, कुणाच्या शोकसभेत किंवा घटस्फोटाच्या सुनावणीला गेल्यावरही असेच बोलतात की काय. (बाकी तिथे एखाद्या सहनशक्ती संपलेल्या व्यक्तीने यांच्या कानाखाली टाळ्या वाजवल्याशिवाय हीचं हे ’टाळ’तंत्र आटोपणं ’असंभव’!!!)
दिग्दर्शक ’माजन टांगे’ – हा पाउस लोकांचा कितीही आवडता असला, त्याला परिक्षकांनी कितीही मार्क दिलेले असले आणि त्याला कितीही sms मिळालेले असले तरीही अंतिम विजेता केवळ आम्हीच ठरवणार. हा आमचा कार्यक्रम आहे त्यामुळे ’निकाल’ ही आम्हीच लावणार. (असे म्हणून ’शेरलॉक होम्स’ला लाजवेल अश्या गुप्ततेने ते व त्यांची टीम रीझल्ट मॅन्युप्युलेट करायच्या विकट कामात गढून गेली.)
**********************************************************************************
आता काही मान्यवर आणि त्यांच्या प्रतिक्रिया in short –
कवी ’संदेश आडगावकर’ –
पाउस म्हणजे पाउस म्हणजे अगदी सेम असतो
ढगाने आपल्यावर केलेला मोठा गेम असतो.
दै.’ठोकसत्ता’चे संपादक श्री. ’सुमार बेतकर’ –
आज पुर्ण राज्य एका अराजकाच्या तोंडाशी येउन उभे राहिले आहे. संसाधनांचं विषम वाटप हे जितकं याला कारणीभूत आहे तितकचं राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा. पावसासाठी यज्ञ, प्रार्थना वगैरे उजव्या विचारसरणीच्या उपायांचा काहीही उपयोग होणार नाही. या अभूतपूर्व परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य फ़क्त एका ’आंधी’ घराण्यात आहे. महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी, बुद्धीजीवी मंडळींच्या वतीने मी ’आंधी’ कुटंबाचे युवा नेते ’काहूल आंधी’ यांना देशाची धुरा सांभाळण्याचे आवाहन करतो.
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री. ’सावधूत हप्ते’ – (चष्मा एकदम स्टाईलने सावरत)
(आकाशाकडे बघत) तोड्‍लसं मित्रा..... एकदम तोड्‍लसं..... मर्द मराठा गडी तू.... काय पडायचास दरवर्षी तू.... एकदम चाबूक..... पण मित्रा, यंदा काय झालं?..... असं करू नकोस.... या इथं जमलेल्या सगळ्या लोकांवर सॉल्लिड वर्षाव कर.... इतका कर की नादखुळा.........
मराठीतला सुपरस्टार ’परत माधव’ – (ट्रेडमार्क बावचळल्याचा अभिनय करत)
ए....आय्याआआआ.....गलगले, मी काय म्हणतो, या लोकांना काय करायचं ते करू द्या.... तुम्ही यात पडू नका......आता का काय? दादाने सांगितलं नाही का? गलगले, मी काय म्हणतो, पाउस पडला नाही ना तर बरेच होइल..... लोक पाणी पाणी करत त्रासतील म्हणजे तुमच्या पॉलिसींचा खप वाढेल......
विचारवंत आणि चरित्र अभिनेते डॉ. मागू – (भयानक चेहरे करत)
हा पाउस आणि त्याच्या नावाने चाललेला गोंधळ म्हणजे एक नुसता त्रास आहे. आता कुठे गेला तुमचा देव? खरं सांगायचं तर भक्तीबिक्ती सगळ्या बुरसटलेल्या कल्पना मोडीत काढून प्रत्येकाने अतिशय बुद्धीनिष्ठ बनायला हवं. पाउस पडणे किंवा न पडणे यासाठी केलेले सर्व उपाय हे अंधश्रद्धा या सदरात मोडतात.
**********************************************************************************
हा लेख वाचून एका समीक्षकांची प्रतिक्रिया –
लेखकावर बर्‍याच जुन्यानव्या टारगट साहित्यीकांचा प्रभाव दिसतोय. नेहमीप्रमाणेच अतिशय वात्रटपणे दुसर्‍यांची खिल्ली उडवण्याचे अधम कृत्य यांनी चालूच ठेवलेले आहे. मोठमोठ्या मान्यवरांच्या कासोट्याला हात घालण्याची कुवत व हिम्मत या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या क्षुद्र इसमाकडे कोठून आली हे कळायला मात्र काही मार्ग नाही. अर्थात विनोद निर्मितीच्या त्याच्या या केविलवाण्या प्रयत्नाबद्दल शिक्षा म्हणून त्याला ’मराठी व्याकरणाची उत्पत्ती व स्थिती’, ’दिवे आगर परिसरातील भू-जलपृष्ठभागाचा तौलनिक अभ्यास’ ’सातवाहन शकातील चलनवलनाच्या पद्धती’ या विषयांवरचे लेख वाचण्यास द्यावेत :D:D त्यातूनही हा गुन्हेगार वाचलाच तर प्रायश्चित्त म्हणून आपल्या आवडत्या आईसक्रीम, कॅडबरी शेक, मस्तानी वगैरे पदार्थांपासून त्याने स्वतःला पुढच्या पावसाळ्यापर्यंत वंचित ठेवावे !!!
**********************************************************************************