Friday, June 26, 2009

आकाशात जेंव्हा

आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात.......
आत कातर होतं मन,
अस्वस्थ होतो रोमरोम आणि,
तरळून जातात वाहून गेलेले असे कित्येक श्रावण......
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात.......
कसा सावळा होऊन जातो जीव,
जाणवून जाते त्या श्यामकांताची उणीव,
आठवत राहतात डोळ्यातल्या ओलाव्याचे विरहक्षण......
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात.......
अनोळखी मनमोराचाही फुलतो पिसारा,
थेंबांच्या स्पर्शासाठी कसा व्याकुळ होतो प्राण सारा,
पण अनामिक भीतीचं, भावाला बुद्धीचं, तस्संच लांबलचक धरण........
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात.......
तोडून द्यावासा वाटतो एक अनिवार बंध,
फुलपाखराच्या गाण्यांचे आणि भिजलेल्या मातीचे लागतात छंद,
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्यांचे आपल्यावरही उमटतात थोडे व्रण..........
आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात.......
तेंव्हा सगळचं कसं होवून जातं ओलं, मिट्ट अन्‍ गडद,
वीजांची बनतात चित्रं, वार्‍यातूनही ऐकू येतो एक निषद,
काळ्याभोर आठवणींमध्ये कोरडे मात्र राहून जातो आपण.........

आकाशात जेंव्हा काळे ढग दाटून येतात.......
घडत राहतं बरचं काही..... आत, बाहेर आणि सर्वत्र.......