Wednesday, May 13, 2009

ते मंतरलेले दिवस....

अहाहा काय दिवस होते ते .....
झी मराठीवर 'सा रे ग म प' सुरु झाले आणि एक खजिनाच उघडला गेला - अज्ञातात लपलेला...
पहिल्या वहिल्या पाउसधारांसोबत हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा काय संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या... पण गारुड हळुहळु वाढत गेलं.... भूल हळुहळु चढत गेली..... स्वरमोहिनीने सर्वांनाच आपल्या कवेत घेतलं....

वृंदावनातली एक प्रसन्न सकाळ....
कोवळया किरणांनी दिशा उजळून टाकलेल्या... पूर्वेकडून वाहणारा मंद मंद वारा....
गर्द कदंब वृक्षाखाली उभा असलेला मनमोहन श्रीरंग एकदा हसून पाहतो सर्वांकडे....
त्याची कर्णमधुर बासरी ऐकण्यासाठी गोपीजन आतुर झालेले....
आता भगवंत ती मुरली उचलतील आणि छेडतील पुन्हा तेच भान हरपून टाकणारे सूर....
आता फ़क्त राहील एक ईश्वरीय संगीत.....ऐकणारा आणि ऐकविणारा एकरूपच जणू....

ही मुलं गायला लागली की असचं होवून जायचं काहीसं.......
ते दिवस खरोखर एक बेहोषीचे होते...... मनात एक मारवा होता.... चांदलकेरीची उर्मी होती...... एक अनामिक ओढ़ होती....
तसं म्हटलं तर सोमवार म्हणजे चाकरमान्यांच्या द्रुष्टीने नावडता वार !! 'Monday Morning Blues' 'Dreadful Monday' वगैरे विशेषणं लावून लोक आपली नापसंदी व्यक्त करत असतात. पण Little Champs सुरु झाले आणि बिचार्या सोमवारचे ग्रहच पालटून गेले. चमत्कार घडू लागला...लोक सोमवारची अधीरपणे वाट पहायला लागले.....कधी एकदा येतोय सोमवार आणि कधी एकदा आपण पाहतोय सा रे ग म ?
Reality Show तर खुप होते आणि आहेत तर मग हाच का इतका मनात घर करून राहिला ??
अगदी जवळ्चा वाटला..... वेड लावून गेला.....

साधारण बुधवार आणि गुरुवार आधीच्या एपिसोड मध्ये झालेली गाणी आणि मुलांचे अप्रतिम performances यावर चर्चा करण्यात जायचे....
शुक्रवार लटक्या रागाच्या भांडणात जायचा...
मुग्धा भारी का शरयु भारी...प्रथमेश चांगला का शमिका चांगली...
शेवटी सगळेच अतिशय गोड गायले असे एकमताने conclude करून पांगापांग व्ह्यायची.
शनिवार सकाळ आणि रविवार दुपार या स्वरांसोबत जगणे व्ह्यायचे......

कितीतरी उदात्त आणि विलोभनीय गीतं......
आपल्याला भूतकाळात घेवून जाणारी...
आपल्याला चटका लावून जाणारी....
ओठावरचं स्मित फुलविणारी....
अंगावर रोमांच उभे करणारी.......
आपल्या नेत्रडोहांचे बांध फोडणारी........
आतल्या भाव-विश्वाला हळूच गोंजारणारी......
कधी कधी अस्वस्थ करणारी......
आणि कधी समाधीस्थ करणारी......
आपल्याला मुळासकट हलविणारी.......
आपल्या जीवनाला येवून भिडणारी......
कंठातल्या हुंदक्यापाशी अडणारी.......
क्षणोक्षणी सुखावणारी......
आपल्याला सर्वस्व देवू पाहणारी......
आणि ही मुलं जे जे काही सादर करायची ते प्रेक्षणीय , श्रवणीय असायचे...
त्यांचं वागणं, बोलणं, गाणं खुप नैसर्गिक वाटायचं.... त्याला कृत्रिमतेचा गाज नव्हता.... सराईतपणाचा बाज नव्हता.....
होता तो फ़क्त गान-साधनेचा सुगंध.... नितळ नि मोहक......

एखादा भाग चुकला की मरणप्राय यातना व्ह्यायच्या...वाटायचं, आपण आज कसे काय नाही सहभागी त्या सुधारसाच्या पंक्तीत ??
असा एकही टप्पा नव्हता जो you-tube वर परत परत पाहीला नाही...
आयुष्यातले चढ़-उतार चालू होते....नियतीच्या खेळात आपली होत असलेली परवडही चालूच होती...काळोख्या रात्री होत्या.... खडकाळ रस्ते आणि पसरलेले काटेही तसेच होते...
पण या मुलांकडून अलौकिक स्वरभेटी मिळायच्या आणि तात्पुरता विश्राम मिळून जायचा...
थोड्या काळाकरीता का होईना पण सगळ्याचा विसर पडायचा..... आपण अगदी वेगळ्या विश्वात जावून पोहोचायचो.....
ही मुलं आपली वाटायला लागली होती...... असे काय भावबंध जोडले गेले होते त्यांच्याशी???
कोणी आम्हाला बालगंधर्वाँच्या काळात घेवून जायचे तर कोणी संतांच्या मांदियाळीत....
कोणी ऐकवायचे आजचा आवाज तर कोणी दाखवायचे कृष्णधवल रंगातला भूतकाळ......
सोमवारी तर उत्सुकता शीगेला पोहोचलेली असायची.
आज काय ऐकायला मिळ्णार? कोण काय म्हणणार ? कुणाचं गाणं गायलं जाणार? नाट्यसंगीत का भक्तीसंगीत?
एवढेच नाही तर ......
आज प्रथमेश कोणता ड्रेस घालणार? आज मुग्धाची हेयर-स्टाइल कशी असणार? शाल्मली कुणाची नक्कल करणार? श्रेया आज कोणत्या भावमुद्रा करणार? रोहीत आज काय धमाल करणार?
या आणि अश्या असंख्य प्रश्नांसकट आपण साडेनऊ वाजण्याची वाट पहात रहायचो....
पल्लवी, अवधूत आणि वैशालीही खूप मज्जा आणायचे.....
मंगळवारी मात्र कार्यक्रम संपता संपता हुरहुर जाणवायला लागायची.....आता एक आठवड्याचा विरह......
एलिमिनेशनचे टेंशन तर वेगळेच... अर्थात बाकीच्या channel सारखा असह्य नाटकीपणा इथे कधीच नव्हता....

श्रावणातील सोनेरी सकाळ असावी.......
रिमझीम पडून गेलेल्या पावसाने आसमंत ओलाचिंब करून टाकलेला असावा..... कोवळया किरणांनी चमचम करीत परीसर उजळून टाकलेला असावा...... वातावरणातील ओलाव्याने अंग-प्रत्यंगाला नाजुकपणे स्पर्श करावा...
तश्यातच कुठूनतरी जाई-जुईचा, मोगर्याचा असा बेभान करणारा सुगंध दरवळावा.... विकाररहीत, निर्मळ, निरागस, परिशुद्ध !!!

Little Champs बघताना आणि त्यात स्वतःला हरवून टाकताना मला हा अनुभव नेहमी यायचा......
या मुलांचा आवाज खुप आत आत घुमला..... त्याने प्रसंगी कातर केलं......
कुठला झंकार छेडला गेला माहीत नाही पण सूर जुळून आले....लय साधली गेली..... समाधानाचे हुंकार आले... आनंदाचे अश्रू आले..... ह्रदय कुणीतरी धुवून स्वच्छ करावं तसं वाटायला लागलं.....
त्यांच्या आवाजानं एकेक गाठी उकलायला लागल्या.....
आणि......
स्वतःचा नव्याने शोध घेणं चालू झालं !!!!!!!