Saturday, April 4, 2009

माझ्या शुभेच्छा मुग्धाला .....

प्रिय मुग्धा,
आज माझ्याकडे तुला देण्यासाठी अन्तःकरणापासून आशीर्वाद आणि खुप खुप शुभेच्छा आहेत फ़क्त !!! पण तू मला जे भरभरून दिलसं त्याचा उतराई कसा होवू?
पहिल्यांदा तुला पाहिलं आणि वाटलं मूर्तिमंत निरागसपणाच अवतरलाय, आपल्या मधाळ जादूची पखरण करत..
तुझे पहिलेवहिले शब्द ऐकले आणि चांदरातीच्या शीतलतेने अगदी शांत शांत होवून गेलो...
अमृतात बुचकाळून काढल्यासारखे तुझे लाघवी उच्चार,
ऐकणार्याचा ठाव घेणारे मोठे मोठे टपोरी डोळे,
आसमंतात चैतन्य निर्माण करणारे तुझे पिटुकले मंत्रमुग्ध व्यक्तिमत्व - सगळचं दैवी आणि सुबक !!
"गातो कबीर दोहे" ऐकताना तर श्वासच रोखला गेला होता माझा कितीतरी काळ...
आणि मग एक वेडच लागुन गेलं, मुग्धा नावाचं...
सुरु झाला एक हवाहवासा वाटणारा स्वरप्रवास - "मनीमाउचे बाळ" पासून ते "डोकं फिरलेया" पर्यंत..
तू गात होतीस आणि बेभान होत होतो आम्ही...
तू माइकवर ताल धरायचीस, चिमुकल्या बोटांनी आणि रंगून जायचं आमचं मन..
तू कित्ती कित्ती सुंदर दिसायचीस, गोड गोड हसायचीस आणि सर्व जगाचा विसर पाडायचीस...
तू म्हटलेली गाणी कधी कधी डोळ्यात पाणी आणायची (एका तळ्यात होती, देव कधी जरी, चाफा बोलना, हुरहुर असते ई.) वाटायचे की ही केवढीशी मुलगी आणि किती खोल हात घालते काळजात...
पण तू हास्यही फुलवायचीस तितक्याच ताकदीने.... कित्येकांची जीवनचं बदलून गेली गं तुझ्यामुळे... चकोरासारखे आतुर होवून आम्ही वाट पहायचो, केंव्हा तू येतेस आणि केंव्हा घेवून जातेस भावसमाधीत....
देवाची तुझ्यावर पुष्कळ कृपा आहेच, पण बहुतेक तो माझ्यावरही खुश दिसतोय म्हणुनच तर 'मुग्धा वैशंपायन' नावाची जादूची परी आणली त्याने जीवनात.....
मला नेहमी वाटते तुझ्याबद्दल कितीही लिहिले ना तरी ते शब्द अपुरेच पडतात, तू आहेसच अशी - मोहक, आगळी वेगळी आणि गोड गोड !!!
तू खुप मोठी होशीलच पण तुझ्यावर झालेले उत्तम संस्कार आणि तुझी निरागसता तुझे कायम रक्षण करत राहणार यात शंकाच नाही...
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.... यशस्वी भव, सुखी भव...
तुझ्या स्वरलेण्यांचा सुगंध असाच दरवळत राहों आणि सर्वजण यात न्हाहून निघोत, पुन्हा पुन्हा....
मी ईश्वराकडे तुझ्या समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करतो...
आणि हो, मुग्धा, विलक्षण आनंदाचे जे हळुवार क्षण दिलेस तू आम्हाला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!!!

...तुझा एक सर्वसामान्य चाहता,
~विक्रांत~